जालना : कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक, अतिरीक्त पोलिस अधीक्षक, तीन पोलिस उपअधीक्षक आणि १४ पोलिस निरीक्षकांसह १२०० कर्मचारी जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.मुस्लीम बांधवांचा पवित्र समजला जाणारा रमजान इद हा सण गुरूवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी नमाज अदा करण्यासाठी मुस्लीम बांधवांची सकाळपासून इदगाह मैदानावर गर्दी होत असते. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सांगितले.भोकरदन, अंबड आणि जालना विभागात तीन पोलिस उपअधीक्षकांवर सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात पोलिस कर्मचारी, होमगार्ड, स्पेशल फोर्स, एसआरपी अशी कुमक सुरक्षेसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी उभी दिसेल. तर जिल्ह्याच्या ठिकाणाहून पोलिस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक हे सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. (प्रतिनिधी)
रमजान ईदसाठी जिल्ह्यात चोख बंदोबस्त
By admin | Updated: July 6, 2016 23:44 IST