औरंगाबाद : कन्नडमधील शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी शिवसेनेची अवस्था झाली असून, यातून बाहेर पडण्यासाठी सोमवारी जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक कन्नडमध्ये झाली. या बैठकीला आ.जाधव गैरहजर होते. त्यांनी कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वत:चे पॅनल उभे केले असून, शिवसेनेने सर्वपक्षीय पॅनलच्या मदतीने उमेदवार दिले आहेत. स्वपक्षाचा आमदार असताना शिवसेनेला दारोदार हिंडण्याची वेळ आल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्नडमध्ये आ.जाधव यांनी स्वत: पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करणारे निवेदनच प्रसिद्धीस देऊन खळबळ उडवून दिली. सेनेचे उपनेते खा.चंद्रकांत खैरे यांच्यावर त्यांनी त्यातून आरोप केले. त्यामुळे जिल्हाप्रमुख त्रिवेदी यांनी आज तातडीची बैठक घेतली. १० तास ही बैठक चालली; परंतु यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ९ आॅक्टोबर रोजी कन्नडमधील सुमारे ३०० पदाधिकाऱ्यांनी आ.जाधव यांच्या विरोधात आवाज उठविला. पदाधिकाऱ्यांनी खा.खैरे यांची रेल्वेस्टेशन येथील खाजगी निवासस्थानी भेट घेऊन राजीनाम्याचा इशारा दिला. त्यानंतर खा.खैरे यांनी जाधव यांचे वागणे योग्य नसल्याचे सांगून कन्नडमधील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करीत पदाधिकाऱ्यांची बाजू घेतली. दरम्यान, आ.जाधव यांनी शिवसेनेचे पदाधिकारी निष्क्रिय असल्याचा आरोप करून पक्षातून माझी हकालपट्टी करा, असे निवेदन प्रसिद्धीस दिले. सेनेतील हा सगळा अंतर्गत बेबनाव पक्षासाठी घातक असल्यामुळे स्थानिक पातळीवर मनोमिलन करण्याचा प्रयत्न आठवडाभर झाला. परंतु त्यातून काहीही हाती लागलेले नाही.