नजीर शेख, औरंगाबादजगप्रसिद्ध अजिंठा लेणी तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी अप्रतिम शिल्पकलेच्या माध्यमातून बद्धिस्ट कल्चर साकार झाले आहे. वेरूळ हा हिंदू शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. औरंगाबाद, खुलताबाद ही ऐतिहासिक शहरे आहेत, तर बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे सुंदर असे नैसर्गिक ठिकाण आहे. पर्यटनवाढीसाठी या सर्व ठिकाणांचा एकत्र विचार केल्यास हा परिसर भारतातील सर्वांत मोठे पर्यटनस्थळ बनेल, असे मत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक पांडुरंग कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात बोलत असताना कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांसंबंधी विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, अजिंठ्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये आहे. लोणार सरोवरासंबंधीही जगभरामध्ये पर्यटक आणि संशोधकांमध्ये आकर्षण आहे. याचा फायदा आपणाला उचलता आला पाहिजे. पर्यटन विकास महामंडळाकडून तसे प्रयत्न चालू आहेत. बुद्धिस्ट कल्चरबाबत जगभरातील जपान, श्रीलंका, थायलँड या देशांमध्ये मोठे आकर्षण आहे. असा वारसा त्यांना जगभरात कुठेच आढळत नाही. त्यामुळे या देशातील विद्यार्थी, पर्यटक आणि संशोधक येथे येण्यास उत्सुक असतात. मात्र, औरंगाबादहून थेट विमानसेवा उपलब्ध नसल्याने येथे येण्यात काही प्रमाणात मर्यादा येतात. औरंगाबाहून अशा देशांमधील राजधानीच्या ठिकाणी थेट विमानसेवा उपलब्ध झाल्यास येथे पर्यटकांची संख्या वाढेल. लोणार सरोवरालगत पर्यटनाच्या दृष्टीने काही सोयी निर्माण करणे गरजेचे आहे. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक दरवाजे दुरुस्त केल्यास व तिथे त्या दरवाजाच्या निर्मितीसंबंधीची माहिती चांगल्या पद्धतीने लावली गेल्यास हे दरवाजे पाहण्यासाठी शहरात पर्यटकांचा एक दिवसाचा मुक्काम वाढेल. वेरूळ लेणी परिसरातही अद्याप खूप काही गोष्टी करणे आवश्यक आहे. दळणवळणाच्या सोयीबाबत आपण फारसे आग्रही राहत नाही. बदामी आणि जयपूरसारख्या ठिकाणाहून या ठिकाणी रेल्वेसेवा लवकर सुरू व्हावी. पॅलेस आॅन व्हील यासारख्या गोष्टींची येथे आवश्यकता आहे. याबाबत सर्वंकष विचार होणे आवश्यक आहे. आमच्या दृष्टीने पर्यटनवाढीसाठी या परिसरात ‘न्याहारी- निवास योजना’ राबविणे गरजेचे आहे. कोकणामध्ये या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.मात्र, आपल्याकडे अद्याप म्हणावा असा प्रतिसाद नाही. पर्यटकांना स्वस्त दरात निवास आणि न्याहारीची सोय होते, तर जनतेलाही याचा आर्थिकदृष्ट्या फायदा होतो. न्याहारी- निवास योेजनेमुळे वाढीव पर्यटकांना येथे सामावून घेण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे स्वच्छतेचा अभाव असल्याने विदेशी पर्यटकांची संख्या म्हणावी अशी वाढलेली नाही. मागील दहा वर्षांत केवळ दहा टक्के विदेशी पर्यटक वाढले आहेत. ही संख्या आणखी काही टक्क्यांनी वाढायला हवी. हिल स्टेशन म्हणूनही विचार हवाआज आपण सर्व जण अजिंठा- वेरूळ, बीबीका मकबरा तसेच इतर ऐतिहासिक स्थळांसंबंधीचा आणि त्याच्या विकासाचा विचार करतो. मात्र, त्याचबरोबर म्हैसमाळ, दौलताबाद, अब्दीमंडी या ठिकाणचा परिसर अतिशय सुंदर आहे. औद्योगिक क्षेत्रापासून दूर असलेला हा परिसर स्वच्छ हवा. हा परिसर सुंदर लोकेशनचा आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे गरजेचे आहे. मलेशिया, दुबई या ठिकाणी सिमेंटच्या जंगलांची पर्यटनस्थळे आहेत. आपल्याकडे तर संपन्न वारसा आणि नैसर्गिक लोकेशन्स असल्यामुळे या परिसराचा भारतातील सर्वांत मोठे पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ शकतो, असे वाटते.
देशातील सर्वांत मोठे पर्यटनस्थळ व्हावे
By admin | Updated: August 30, 2014 00:17 IST