मारूती कदम , उमरगाकर्नाटक सिमावर्ती भागात असलेल्या उमरगा तालुक्यातील आष्टा जहांगीर हे विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे गाव. गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे तुरोरी मध्यम प्रकल्प झाला. त्यामुळे सिंचनक्षेत्रात वाढ झाली. परंतु, दुसरीकडे गावातील मुलभूत विकास केंद्रांना अवकळा आली आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत. निधीअभावी व्यायामशाळेचे काम अर्धवट आहे. ग्रामपंचायत इमारतही जुनाट झाली असून शाळेची इमारतही दुरूस्तीला आली आहे.तीन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या आष्टा जहांगीर या गावातून आलेले प्रा. रवींद्र गायकवाड यांनी तब्बल दोन टर्म उमरगा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. तर सध्या ते उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या गावातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. परंतु, सिंचनाची शाश्वत सुविधा नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांची स्थिती बेताची होती. हे चित्र बदलण्यासाठी प्रा. गायकवाड यांनी पुढाकार घेत तुरोरी मध्यम प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली. असे असतानाच दुसरीकडे मात्र, मुलभूत सुविधा फारशा सक्षम दिसत नाहीत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून सन २००२ मध्ये येथे पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला. मात्र, आजघडीला या इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत. परिसरात काटेरी झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संरक्षक भिंतीचा पत्ता नाही. त्यामुळे या दवाखान्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना ‘असून अडचण, नसून खोळंबा’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे. गावांतील तरूणांची संख्या लक्षात घेवून गावात पुनर्वसन कालावधीत व्यायामशाळा उभारणीचे काम हाती घेण्यात आले. परंतु, निधी कमी पडल्यामुळे हे काम आजही अर्धवट स्वरूपात आहे. हीच अवस्था ग्रामपंचायत इमारतीची झाली आहे. सदरील इमारत जुनाट झाली असल्याने दुरूस्तीची गरज व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद शाळेची इमारतही डागडुजीला आली आहे. अंगणवाडीसाठी नवीन इमारत बांधण्यात आली. परंतु, संरक्षक भिंतीचे काम आजवर झालेले नाही. एकूण गावातील महत्वाच्या सेवा देणाऱ्या केंद्रांच्या इमारतीला एकप्रकारे अवकळा आली आहे. त्यामुळे भविष्यात तरी प्रा. गायकवाड यांनी गावच्या सर्वांगिण विकासासाठी भरिव मदत करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
आष्टा येथील मुलभूत केंद्रांना अवकळा !
By admin | Updated: March 13, 2015 00:40 IST