औरंगाबाद : चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री गजबजलेल्या जालना रोडवरील जळगाव टी पॉइंट येथील बँक आॅफ महाराष्ट्र फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु बँकेतील रक्कम चोरून नेण्यात चोरट्यांना यश आले नाही. विशेष म्हणजे मागे चोरटे बँक फोडण्याचा प्रयत्न करीत असताना समोर बँकेच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात होता. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, जालना रोडवर जळगाव टी पॉइंट चौकात बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. या बँकेच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर चोवीस तास वर्दळ सुरू असते. समोर सुरक्षारक्षक आहे, रस्ता वर्दळीचा आहे, आपण पकडले जाऊ शकतो, याची तमा न बाळगता अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री बँकेच्या मागील बाजूचा दरवाजातोडला. तेथून चोरटे आत घुसले. त्यानंतर या चोरट्यांनी बँकेतील सर्व ड्रॉवर उघडले. मात्र, त्यात चोरट्यांना काही सापडले नाही. याच कालावधीत चोरट्यांनी बँकेत सीसीटीव्ही असल्याचे लक्षात आल्यानंतर या कॅमेऱ्याचे वायर कापून टाकले. नंतर या चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातही त्यांना अपयश आले. शेवटी चोरटे रिकाम्या हाताने निघून गेले. विशेष म्हणजे त्यावेळी बँकेत मोठी रोख रक्कम होती. सुदैवाने ती बाचावली.शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बँक उघडल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या चोरीप्रकरणी बँकेचे अधिकारी सतीशचंद्र शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
बँक फोडली; रोख रक्कम सुरक्षित
By admin | Updated: October 17, 2014 23:56 IST