औरंगाबाद : उन्हाळ्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला नाही. त्याऐवजी आहाराची तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खाते जमा करण्यात येणार आहे. मात्र, या आदेशाने पालक वर्गात गोंधळ उडाला आहे कारण, अवघ्या १५० रुपयांच्या रकमेसाठी बँक खाते उघडावे लागणार आहे. राष्ट्रीयीकृती बँकेत खाते उघडण्यासाठी हजार रुपये भरावे लागत आहेत. ही रक्कम खात्यात जमा करण्याऐवजी थेट शाळेतून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
केंद्र शासनाचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आहे. या अंतर्गत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शाळा सुरू असते तेव्हा विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप केले जाते. मात्र, १५ एप्रिल ते १५ जून २०२१ या उन्हाळ्याच्या सुटीच्या काळ व लॉकडाऊन यामुळे विद्यार्थी या आहारापासून वंचित राहिले. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या खर्चाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. पोषण आहाराअंतर्गत पहिली ते पाचवी इयत्तातील एका विद्यार्थ्याला ४ रुपये ४० पैसेप्रमाणे ३५ दिवसाचे १५६ रुपये ८ पैसे तर सहावी ते आठवी इयत्तातील एका विद्यार्थ्याला ६ रुपये ७१ पैसे एका दिवसाचे देण्यात येणार आहे. म्हणजे २३४ रुपये ८५ पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. विद्यार्थ्याच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यास हजार रुपये लागतात. यामुळे पालकांसमोर पेच पडला आहे की, येणाऱ्या रकमेपेक्षा बँक खाते उघडण्यास जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. मग बँक खाते उघडावे की, नाही, असा प्रश्न पालकांसमोर पडला आहे. जिल्ह्यात पहिली ते पाचवी अंतर्गत ४४१८०० तर सहावी ते आठवी अंतर्गत २,५०,६१७ असे ६ लाख ९२ हजार ५१७ विद्यार्थी आहेत.
चौकट
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
इयत्ता विद्यार्थी संख्या
पहिली ८८,३२९
दुसरी ८८,१८९
तिसरी ८८,२०२
चौथी ८९,२११
पाचवी ८७,८६९
सहावी ८६,२०७
सातवी ८५,०४४
आठवी ७९,३६६
---------------------------------------------
त्या रक्कमसंदर्भात अजून नाही आले आदेश
१५ एप्रिल ते १५ जून या ३५ दिवसांच्या काळातील शालेय पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे; मात्र ही रक्कम कधी द्यायची, कधी जमा होणार, याचे काही आदेश आले नाही. मात्र, १५ जून ते ३१ जुलै या ४० दिवसातील पोषण आहाराचे वाटप लवकर शाळेतून विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.
बी. ए. देशपांडे
पोषण आहार अधीक्षक, जिल्हा परिषद
--------------------
चाराने की मुर्गी आणि...
माझा मुलगा पाचवी इयत्तेत शिकत आहे. शालेय पोषण आहाराची रक्कम त्याच्या खात्यात १५६ रुपये जमा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी गेलो तर हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले. शून्य टक्के रकमेवर आता खाते काढल्या जात नाही. चाराने की मुर्गी, आठाने का मसाला असा हा प्रकार झाला.
विलास ठाकूर, पालक
---
पालकांच्या खात्यावर रक्कम जमा करा
माझा मुलगा सातवीमध्ये शिकतो. त्यास शालेय पोषण आहारापोटी २३४ रुपये मिळणार आहेत. त्याचे खाते काढण्यासाठी हजार रुपये लागतात. त्याऐवजी पालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी. नसता शाळेतून रक्कम वाटप करण्यात यावी.
मिलिंद औचरमल, पालक
------