जळकोट/हाळी हंडरगुळी : मृगाबरोबरच आर्द्रा नक्षत्र संपत आला असतानाही तालुक्यात पावसाने हजेरी लावली नाही़ दिवसभर उन्हाळ्यासारखे ऊन आणि जोरदार वारे सुटत असल्याने शेतकरी धास्तावला आहे़ उन्हाळ्यात गारपीट आणि पावसाळ्यात ऊन ही परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे़ बळीराजाने काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सावकारी कर्ज काढून महागाचे बी-बियाणे खरेदी केले़ शेतकऱ्यांनी उन्हाळ्यापासून शेतीतील कामे उरकून जूनच्या खरीप हंगामाच्या तयारीत होता परंतू महिना उलटला तरी पाण्याचा थेंब पडला नाही़ त्यामुळे शेतकरी देवाकडे प्रार्थना करीत आहे़गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याचे दिसून येत आहे़ ढग आभाळात भरून येत आहे़ परंतु वारे सुटल्याने पुन्हा ते विरत आहेत़ दिवसभर ढगाळ वातावरण रात्री टिपूर चांदणे पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ तालुक्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने साठवण तलावे भरली होती़ त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०० हेक्टर जमीनीवर ऊसाची लागवड केली आहे़ परंतु, यंदा पाऊस झाला नसल्याने साठवण तलावही कोरडे पडत आहेत़ परिणामी ऊस उत्पादकांची डोळ्याची झोप उडाली असल्याचे दिसून येत आहे़हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरात यंदा मृग नक्षत्राच्या सुरूवातीला पावसाने आशादायी सुरूवात केल्याने शेतकरी आनंदी झाला होता़ अधूनमधुन पावसाच्या सरी पडत होत्या़ त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, शेतीची अवजारे खरेदी करून ठेवली़ परिसरात अंशत: ठिकाणी पेरण्या झाल्या व पिकाची उगवण झाली मात्र त्या बोटभर पिकांना जगवायचे कसे व उर्वरीत पेरण्या कशा करावयाच्या यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत़मागील दोन तीन वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्याला चांगलेच अडचणीत आणले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे़ यंदा तरी चांगला पाऊस होईल या अपेक्षेने हाळी हंडरगुळी परिसरातील शेतकऱ्यांनी मशागतीची कामे वेळेत पूर्ण करून घेतली़ मृग नक्षत्राच्या सुरूवातीला पावसाने मध्यम हजेरी लावली़ आकाशात पावसाचे ढग येऊन मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने आज ना उद्या पेरणी योग्य पाऊस होईल असे शेतकऱ्यांना वाटत होते़ हाळी हंडरगुळी परिसरातील वडगाव, शेळगाव, आनंदवाडी, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, सुकणी या ठिकाणी जूनच्या सुरूवातीला पडलेल्या मध्यम पावसामुळे अंशत: पेरण्या झाल्या आहे़ अद्याप तरी हाळी हंडरगुळी परिसरात मोठा पाऊस झाला नाही़ याऊलट मागील दहा-बारा दिवसांपासून हवामान उन्हाळ्यासारखे झाले आहे़ दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असून रात्री टिपूर चांदणे दिसत आहे़ (वार्ताहर)चाऱ्याचा प्रश्न गंभीऱ़़पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत़ हाळी हंडरगुळी परिसरात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचा हवामान खात्यावरील विश्वास उडाला आहे़ जनावरांना चारा-पाणी कोठून आणावयाचा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़
बळीराजा चिंताग्रस्त
By admin | Updated: July 3, 2014 00:17 IST