बीड : जिल्हा परिषदेतील अनियमिततेचा ठपका ठेवून तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. शिक्षण विभागातील घोटाळे फिरतात ते शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांच्याभोवती! मात्र, आयुक्तांच्या तीन स्वतंत्र समित्यांनी दिलेल्या अहवालानंतरही सानप यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही.शिक्षण विभागात बेकायदेशीर बदल्या, पदोन्नत्या मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. शिपायाला पदोन्नत्तीवर शिक्षक तसेच केंद्रप्रमुख केल्याची हास्यास्पद व आश्चर्यजनक प्रकरणेही बाहेर आली होती. आंतरजिल्हा बदलीने नियमबाह्यपणे एक हजार शिक्षकांना बीडमध्ये आणले होते. बदल्या, पदोन्नत्यांतील अनियमिततेविरुद्ध तक्रारी गेल्यावर तत्कालीन आयुक्तांनी स्वतंत्र समित्यांमार्फत जि.प. ची झाडाझडती घेतली होती. या समित्यांनी शासनाकडे अहवालही सादर केला होता. या काळात सीईओंच्या खुर्चीत जवळेकर तर शिक्षणाधिकारी (प्रा.) म्हणून सानप होते. सानप हे अकार्यक्षम शिक्षणाधिकारी आहेत, त्यांना पदावरुन अवनत करावे, असा खळबळजनक अहवाल उपसंचालकांनी शासनाला पाठविला होता. मात्र, सानप यांची केवळ बदली झाली होती. शिक्षणाधिकारी निरंतरचा पदभार न स्वीरकाता सानप दीर्घ रजेवर निघून गेले. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी निरंतरच विभागाचा पदभार घेतला. आता ते प्राथमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी आहेत. तत्कालीन सीईओ जवळेकर यांच्यावर ग्रामविकास विभागाने कारवाईचा बडगा उगारला; परंतु सानप यांना अभय दिले आहे. सानप यांच्यावर कारवाईची मागणी कास्ट्राईबचे राज्य सचिव श्रीराम आघाव यांनी सोमवारी केली.या बाबत आयुक्त उमाकांत दांगट यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
जवळेकरांवर बडगा; सानप मोकळेच
By admin | Updated: March 17, 2015 00:43 IST