औरंगाबाद : जुन्या मशिदी पाडून बांधून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळून फरार झालेला बडतर्फ पोलीस मोहिनोद्दीन निसार अहमद (६०, रा. चिश्तिया कॉलनी) याला आज नागरिकांनी पकडून पोलीस आयुक्तांसमोर उभे केले. मोहिनोद्दीन अहमद याने जाफराबादवाडी (ता. खुलताबाद) येथील गावकऱ्यांना जुनी मशीद पाडून उत्कृष्ट नमुन्याची नवी मशीद बांधून देतो, असे सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली. त्याचप्रमाणे अन्य गावांतील लोकांनाही त्याने असेच फसविले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, मोहिनोद्दीन अहमद बुधवारी सायंकाळी मिलकॉर्नर येथून जात असल्याचे काही तरुणांनी बघितले. त्यांनी त्याला पकडले. खुलताबाद पोलीस ठाण्यात चल, असे ते त्याला म्हणत होते. तेव्हा त्याने ‘पोलीस आयुक्तांकडे चला’ असे म्हणून त्या तरुणांसह तो पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आला. तेथे खोटे बोलून तो तेथून निसटण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी त्याची चौकशी केल्यावर तो खोटे बोलत असल्याचे त्यांना आढळले. तसेच तरुणांच्या म्हणण्यातही तथ्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस आयुक्तांनी तात्काळ ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांशी बोलून आरोपीवर कारवाई करण्यास सांगितले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या ताब्यात त्याला दिले व नंतर त्याला ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले. जाफराबादवाडी येथील सय्यद अकबर सय्यद मुंतू यांनी याविषयी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.
बडतर्फ फरारी पोलीस पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: June 20, 2014 01:11 IST