गडगा : नादुरुस्त टिप्परवर धडकून दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर अन्य एक जण गंभीररित्या जखमी झाला. ही घटना नरसी-मुखेड राज्य मार्गावर कार्ला फाट्याजवळ ५ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.वाळू वाहतूक करणारा टिप्पर क्र. एमएच-०४-डीएस १०८५ हा मुखेडकडे जात होता. दरम्यान, गाडीचे टायर पंक्चर झाल्याने टिप्पर रस्त्याच्या मधोमध उभा करण्यात आला होता. दुचाकी क्र. एमएच-२६-एजी ७९१० वर दोघे मुखेडकडे जात होते. त्यावेळी समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने दुचाकी भरधाव वेगात टिप्परवर धडकली. या अपघातात बापूराव माधवराव वडजे (वय ४२, रा. बेळी) हे ठार झाले तर नागनाथ संभाजी जुने (वय ३५, रा. बेळी) हे गंभीररित्या जखमी झाले. जखमीस रातोळी येथील विश्वांबर पाटील, गजानन पाटील, बीट जमादार कुमरे यांनी नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पोलिसांच्या मदतीने हलविले. जखमीवर उपचार सुरू असून जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, या अपघातामुळे नरसी-मुखेड मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. (वार्ताहर)
नादुरुस्त टिप्परवर दुचाकी धडकली; एक ठार
By admin | Updated: July 6, 2014 00:13 IST