बालाजी आडसूळ। लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शिराढोण येथील सुधीर लक्ष्मण महाजन यांनी व्यवसाय सांभाळत सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे़ गावातील तीन शाळांसाठी स्वखर्चातून कुपनलिका खोदली असून, यामुळे ५०० विद्यार्थ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे़ गावातील क्रीडा, सांस्कृतिक चळवळीला गती मिळावी, यासाठीही महाजन यांचे प्रयत्न सुरू आहेत़सुधीर लक्ष्मण महाजन हे गावात बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या दोन तपापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत मोठ्या प्रमाणावर भेडसावत होता. याच शाळेच्या परिसरात जिल्हा परिषद उर्दू शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत़ काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जाणवणारी पाण्याची समस्या सुधीर महाजन यांच्याकडे मांडली. विद्यार्थ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महाजन यांनी प्रयत्न सुरू केले़ या कामी जवळपास ५७ हजार रूपये खर्च लागणार होता. यात महाजन यांनी स्वत: ४५ हजार रूपये खर्च करुन कुपनलिका खोदून घेतली़ कुपनलिकेस पाणी लागल्याने आज या शाळेतील तब्बल पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे़सुधीर महाजन यांची शाळेविषयी तळमळ पाहून पालकांनी एकत्रित येत त्यांना व्यवस्थापन समितीचे प्रमुख केले आहे़ शाळा आकर्षक दिसावी, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी शाळेची रंगरंगोटी केली़ यातही खर्चाचा अधिक वाटा त्यांनी स्वत: उचलला़ रंगरंगोटीमुळे शाळेच्या भिंतीही बोलू लागल्या आहेत़ विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे यासाठी आनंद बझार भरवण्यासाठी पुढाकार घेतला. कन्या शाळेत ई- लर्निंगसाठी पुढाकार घेवून १६ हजार रुपए खर्च केले. कार्यक्रमासाठी व्यासपीठाचा अभाव पाहून ती गरजही त्यांनी पूर्ण करून दिली आहे़ गावातील जागृत देवस्थान श्री ढोणश्वर मंदिराच्या जिर्णोद्वारापासून सुरू झालेला महाजन यांचा सेवावृत्तीचा प्रवास आज शिक्षण, क्रीडा, सांस्कृतीक या क्षेत्रातून शेती क्षेत्राकडे वळला आहे.
शैैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीसाठी धडपडणारा अवलिया
By admin | Updated: May 8, 2017 23:38 IST