जालना : येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात गैरकारभार सुरू असून समस्यांचा ढिगारा असल्याचे ‘लोकमत’ने गुरूवारी स्टींग आॅपरेशन करून उघडकीस आणले होते. याची गंभीर दखल घेत विभागीय व्यवस्थापकांनी गुरूवारी पथक पाहणीसाठी पाठविले होते. या पथकाने विविध विभागांची पाहणी करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी ‘म्होरक्यां’ची मात्र चांगलीच धांदल उडाली. जालना शहरापासून जवळच असलेल्या वखार महामंडळात बुधवारी ‘लोकमत’ने स्टींग करून कारभार चव्हाट्यावर आणला होता. या वखार महामंडळात असणाऱ्या १८ गोदामांची ३३ हजार ५८० मेट्रीक टन एवढी साठवणूक क्षमता आहे. परंतु त्याच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे उघडकीस आले होते. येथे असणारे सुरक्षा रक्षक हे सुस्त होते तर याठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी स्थिती बुधवारी दिसून आली होती. साठा अधीक्षक मात्र खाजगी लोकांच्या वळचणीला गेल्याचे दिसून आले होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक बाहेरील लोकांचाच हस्तक्षेप होत असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले होते. अधिकाऱ्यांच्या या हालगर्जीपणामुळे सामान्यांच्या जिवीतास धोका पोहचण्याची भिती व्यक्त होत आहे. अशा या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची गंभीर दखल घेत वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.बी.देवकते यांनी विशेष पथक या गोदामांच्या तपासणीसाठी पाठविले होते. या पथकाने सुरूवातील बस स्थानकाजवळील गोदामांना भेट दिली. त्यानंतर हे पथक राजूर मार्गावरील गोदामांच्या तपासणीसाठी दाखल झाले. पथक आल्याचे समजताच येथील म्होरक्यांनी धूम ठोकली. पथक पाहणी अहवाल देवकते यांना सादर केला जाणार असून पाहणीत काय आढळले याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, अहवाल सादर झाल्यानंतर वरिष्ठांकडून काय कार्यवाही होते, याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)
औरंगाबादच्या विशेष पथकाकडून ्रवखार महामंडळाची झाडाझडती!
By admin | Updated: August 5, 2016 00:10 IST