ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 13 - माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. यंदा विभागीय मंडळाचा ८८.१५ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात (अवघी ००.१० टक्के) किरकोळ वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता विभागीय मंडळाचे अध्यक्ष शिशीर घनमोडे आणि विभागीय सचिव वंदना वाहुळ यांनी दहावीचा निकाल जाहीर केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिशीर घनमोडे यांनी दहावीच्या निकालावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली. यंदा ७ मार्च ते १ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली. या विभागातील औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८३ हजार २३९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ६१ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांचे हे प्रमाण ८८.१५ टक्के एवढे आहे. यंदाही दहावीच्या परीक्षेत बीड जिल्हाच अव्वल ठरला आहे. या जिल्ह्याचा निकाल ९२.६५ टक्के एवढा असून, दुसऱ्या क्रमांकावर जालना (८९.९० टक्के), तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद (८९.५६ टक्के), चौथ्या क्रमांकावर हिंगोली (८०.९३ टक्के), तर निकालामध्ये सर्वात मागे परभणी जिल्हा (८०.८९ टक्के) राहिला आहे. औरंगाबाद विभागात दहावी परीक्षेत याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. या वर्षी विभागात १ लाख ६ हजार ६२३ मुले, तर ७६ हजार ६१६ मुलांनी दहावीची परीक्षा दिली. यापैकी ९१ हजार २५८ मुले आणि ७० हजार २६८ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.५९ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९१.७१ टक्के एवढे आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ६.११ टक्क्यांनी अधिक आहे. समाधानकारक प्रगती नाहीमागील पाच वर्षांचा दहावीच्या निकालाचा विभागाचा गोषवारा तपासला तर विभागाच्या निकालात समाधानकारक प्रगती झाल्याचे दिसत नाही. सन २०१३ मध्ये औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ८१.१८ टक्के, सन २०१४ मध्ये ८७.०६ टक्के, सन २०१५ मध्ये ९०.५७ टक्के, सन २०१६ मध्ये ८८.०५ टक्के आणि यंदा ८८.१५ टक्के एवढा निकाल लागलेला आहे. सलग दोन- तीन वर्षांपासून बीड जिल्"ाने निकालाची आघाडी कायम राखली आहे, तर औरंगाबाद जिल्हा हा सतत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
औरंगाबाद विभागाचा दहावीचा निकाल ८८.१५ टक्के
By admin | Updated: June 13, 2017 15:54 IST