औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील सर्वाधिक मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात १ लाख ६ हजार ३७९ मतदारांपैकी ६७ हजार ७४ पदवीधरांनी म्हणजे ६३.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ पैकी २ तृतीयपंथीय मतदारांनी मतदान केले. ग्रामीण भागातील ७० टक्के मतदानाचा अंदाज आहे.
सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या एका तासात मतदानाचा जोर वाढला. सकाळच्या सत्रात ९.२७ टक्केच मतदान झाले. दुपारच्या सत्रात २०.४८ टक्के मतदान झाले. दुपारी १२ ते २ यावेळेत ३६.९१ टक्के मतदान झाले. २ ते ४ वाजेपर्यंंत ५१.९८ टक्के मतदानाची नोंद झाली. ४ ते ५ या शेवटच्या तासात ६३ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले.
३१ हजार ४१५ महिला मतदारांपैकी १६ हजार ९०७ महिला पदवीधरांनी मतदान केले. ७४ हजार ९५१ पुरूष पदवीधरांपैकी ५० हजार १६५ जणांनी मतदान केले. शेवटच्या तासात १२ टक्के मतदान झाले.
प्रमुख उमेदवारांचा दावा...
भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढली असून त्याचा अर्थ परिवर्तन आहे, असे मी मानतो. विजयाच्या दिशेने भाजपा गेल्याचा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी सांगितले, पहिल्या फेरीतच आमचा विजय होईल. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पुढे येण्याची संधी देखील मिळणार नाही.