उस्मानाबाद : पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांच्या तपासाची गती जिल्ह्यात संथ असल्याची कबुली देत गुन्ह्यांच्या तपासाची गती वाढविणे, गुन्ह्यांचा उलगडा करण्यावर अधिक भर देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली़ गुंडगिरी करून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या गावगुंडांवर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला़उस्मानाबाद येथील पोलीस मुख्यालयाच्या बैठक कक्षात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, उस्मानाबाद पोलीस दलाचे कामकाज हाती घेतल्यानंतर सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना भेटी देवून जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे़ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाण कमी आहे़ गुुन्ह्यांच्या तपासाची गतीही कमी आहे़ यापुढील काळात गुन्ह्यांच्या तपासाला गती देणे, गुन्ह्यांचा उलगडा करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे़ चोऱ्यांचे प्रमाण गतवर्षीपेक्षा यंदा कमी आहे़ असे असले तरी होणाऱ्या चोऱ्या पाहता या चोऱ्या रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून, ठाण्यांना वाढीव वाहने देण्यात आली आहेत़ याचबरोबरच गावस्तरावरील ग्रामसुरक्षा दल, पोलीस मित्रांची मदत घेवून गस्तीचे काम करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत़जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत़नवीन आनंदनगर पोलीस ठाण्यातही लवकरच सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत़ यापुढील काळात यात वाढ करून प्रत्येक ठाण्यात तीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ स्टेशन डायरी जवळ, ठाण्यातील लॉकअपजवळ व प्रवेशद्वारावर एक कॅमेरा बसवून हलचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे़ जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरही कारवाई सुरू करण्यात आली असून, कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही ते म्हणाले़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे, स्थागुशाचे पोनि हरीष खेडकर यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
गुन्ह्याचा तपासाला गती देण्यासाठी प्रयत्न
By admin | Updated: May 31, 2016 00:27 IST