राजकुमार जोंधळे , लातूरगरिबीचे भांडवल न करता आयुष्यात आलेल्या संकटांवर ज्ञानाच्या बळावर मात करुन संधीचे सोने केले. ज्ञानाशिवाय अज्ञान दारिद्र्य आणि गरिबीही घालविता येत नाही, हा बाबासाहेबांचा संदेश प्रमाण माणून आयुष्यातील वाटचाल केली तर संकटांना पळवून लावता येईल. यावर माझा विश्वास आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच माझे जीवन घडले आहे. आता बंदिवानांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करीत आहोत. तुरुंगात येणारा प्रत्येक कैदी परिस्थितीनुसार गुन्हेगार ठरतो. तो कारागृहातून बाहेर पडताना माणूस म्हणून जगला पाहिजे, असे संस्कार कारागृहात करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सातत्याने समुपदेशन करून बंदिवान माणूस म्हणून जगावा, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे लातूर जिल्हा कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हा कारगृह अधीक्षक राजेंद्र मरळे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील फाळेगाव या छोट्याच्या खेड्यात झाला. वडील हिंगोलीतील एका आडतीवर मुनीम म्हणून आजही काम करतात. घरात आई अशिक्षित असूनही, मुलांवर आईने केलेले संस्कार आज आयुष्यभराची शिदोरी ठरली आहे. वडिलांनी अपार कष्ट करुन आपल्या तीनही मुलांना शिक्षण दिले. याच शिक्षणाच्या बळावर आज या घरातील अज्ञान, दारिद्र्य आणि गरिबी दूर झाली आहे. बाबासाहेबांच्या विचारातूनच आजपर्यंत मला प्रेरणा मिळाली आहे. विशेष म्हणजे माझा जन्मच १४ एप्रिल रोजी झाला आहे. केवळ शिक्षणासाठी वडिलांनी हिंगोली येथे घर केले. काबाड-कष्ट करुन त्यांनी आम्हा भावंडांना शिक्षणासाठी साधने पुरविली. अभ्यासात असलेले सातत्य यामुळेच हे यश काबीज करता आले. वडिलांनी शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन हेच आमच्या यशस्वी जिवनाचे गमक आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचे पारायण आयुष्यभर करीत आलो आहे. यातून माझ्या जीवनात अमूलाग्र बदल घडत गेला. घरातील परिस्थिती हलाखीची असतानाही, वडिलांनी मात्र आमच्यासाठी प्रचंड कष्ट उपसले. हे श्रमानेच आमच्यामध्ये शिक्षणाची जिद्द पेरण्याचे काम केले. जालना जिल्ह्यात बहीण ग्रामसेवक म्हणून तर हिंगोली जिल्ह्यात भाऊ जि.प.त कर्मचारी आहे़
बंदीवानांचे आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न
By admin | Updated: March 23, 2016 01:07 IST