कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह : पोलिसांचे खबऱ्याचे नेटवर्क कमकुवत झाल्याची चर्चा
औरंगाबाद : पाच महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या प्राणघातक शस्त्रांची ऑनलाइन खरेदी आणि विक्रीचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या शस्त्रांचा वापर कुठे केला जाणार होता, याची अद्याप माहिती मिळाली नाही. असे असले तरी शहरात कार्यरत असलेल्या दहशतवाद विरोधी पथकाला(एटीएस) या शस्त्र खरेदी-विक्रीची कोणतीही भनक लागली नाही यावरून एटीएसचे अधिकारी, कर्मचारी येथे बसून करतात काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मराठवाड्याची राजधानी, औद्योगिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. शहराने अनेक दंगली अनुभवल्या आहेत. शिवाय सिमी या प्रतिबंधित संघटनेच्या सदस्यांची औरंगाबादेत ऊठ-बस होती. हिमायतबागेत २०१२ साली दहशतवादविरोधी पथकासोबत अतिरेक्यांची चकमक झाली होती. २०१८ साली शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे लहानमोठ्या चार दंगली झाल्या होत्या. अशा या संवेदनशील शहरात दहशतवादविरोधी पथक कार्यरत आहे. पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी या पथकाचे प्रमुख आहे. शिवाय अनुभवी पोलीस अधिकारी, कर्मचारी या पथकात आहेत. औरंगाबाद एटीएसने अनेकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. असे असताना शहरातील बायजीपुरा येथील दानिश खान नावाचा तरुण पाच महिन्यांपासून ऑनलाइन शस्त्रे खरेदी करतो आणि कुरिअरमार्फत ही शस्त्रे नियमित शहरात दाखल होतात. एवढेच नव्हेतर, तो प्राणघातक शस्त्रांची विक्री करतो. याची पुसटशी कल्पनादेखील एटीएससारख्या महत्त्वाच्या संस्थेला पाच महिने आली नाही. यामुळे एटीएसच्या गोपनीय शाखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहर पोलिसांनी या खरेदी-विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दानिशची चौकशी सुरू केली. दानिशचा दहशतवादी संस्थांशी संबंध आहे का? त्याचा शस्त्र विक्रेत्याशी संपर्क कसा आणि कधी आला? ही खरेदी कुणाच्या सांगण्यावरून केली? त्याने आजपर्यंत कुणाकुणाला शस्त्रांची विक्री केली? त्यांची पार्श्वभूमी काय? त्यांच्या शस्त्र खरेदीचा उद्देश काय, यासह अनेक प्रश्नांवर तपास सुरू केला आहे.
-------------
चौकट
खबऱ्यांचे नेटवर्क कमकुवत झाले का?
शहरातील गुन्हेगारांची पाळेमुळे शोधण्यासाठी स्वतंत्र गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे स्तरावर गुन्हे शोध पथक कार्यरत आहे. प्रत्येक ठाण्यात चार ते पाच बीट हवालदार, पोलीस चौक्या कार्यरत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस यंत्रणा कार्यरत असताना पाच महिने शहर पोलीस शस्त्रे खरेदी-विक्रीच्या व्यवसायाबाबत अनभिज्ञ होते. यावरून पोलिसांचे खबऱ्याचे नेटवर्क कमकुवत झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकारी, कर्मचारी खबऱ्यापेक्षा तंत्रज्ञानाच्या आधारे काम करायला प्राधान्य देत असल्यामुळे खबरे तुटत चालल्याचे सूत्रांनी सांगितले. जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या या छुप्या खरेदी-विक्रीचा पुंडलिकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला.
----------------------
कोट
नेटवर्क मजबूत असल्यानेच कारवाई
आपल्या शहरात दुसऱ्या एजन्सीने येऊन कारवाई केली असती तर स्थानिक पोलिसांच्या खबऱ्याचे नेटवर्क कमकुवत आहे, असे म्हणता आले असते. शहर पोलिसांनी अवैध खरेदी-विक्रीचा पर्दाफाश केला. ऑनलाइन खरेदी करून कुरिअरने तलवारी मागविणाऱ्यास पकडले. एवढेच नव्हेतर, त्यास तलवारी विक्री करणाऱ्या अमृतसर येथील अरमान ट्रेडर्सलाही आरोपी केले. त्यालाही लवकरच आम्ही अटक करणार आहोत.
रवींद्र साळोखे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा