लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : माजी मंत्री आ. राजेश टोपे यांचे खाजगी स्वीय सहायक नंदकिशोर पैठणे यांच्याविरोधात शनिवारी रात्री अंबड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचखेडच्या माजी सरपंच संगीता मगरे यांचे पती बाळू निवृत्ती मगरे यांच्या तक्रारीवरून पैठणे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळू मगरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पत्नी संगीता मगरे ही मागील पाच वर्षांपासून चिंचखेड गावाची सरपंच आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत मी स्वत: ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणूक लढवित आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मी सरपंचपदाच्या उमेदवार ज्योती अण्णासाहेब पैठणे यांचे पती अण्णासाहेब पैठणे व गावातील इतर लोकांबरोबर प्रचारासाठी गावात फिरलो.रात्री दहा वाजेच्या सुमारास अण्णासाहेब पैठणे यांचा मुलगा अभिजीत पैठणे याने मला फोन केला की, विरोधी पॅनेलचे बाबासाहेब पैठणे, मुकुंदा म्हस्के, नंदकिशोर पैठणे व इतर काही लोक आमच्या घरी आले आहेत. आईवडील व आम्हाला शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या देत आहेत, तुम्ही तात्काळ आमच्या घरी या. मी तात्काळ अण्णासाहेब पैठणे यांच्या घरी गेलो. नंदकिशोर पैठणे व इतरांना भांडण सोडण्याची विनंती केली असता आमचा न्यायनिवाडा करणारा तू कोण आहेस, असे म्हणत नंदकिशोर पैठणे, बाबासाहेब पैठणे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.नंदकिशोर पैठणे यांच्यासह बाबासाहेब पैठणे, मुकुंदा म्हस्के व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांनी दिली.
पैठणे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:44 IST