औरंगाबाद : ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याचे वृत्त वाहिन्यांवरुन कळताच शहरातही खळबळ उडाली. हजार आणि पाचशेच्या नोटा भरण्यासाठी एटीएमवर गर्दी वाढली. एटीएमच्या कक्षात दहा बारा नागरिक पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी घुसल्याचे चित्र दिसले. पेट्रोलपंपांवरही रांगा लागल्या.वृत्त वाहिन्यांवरुन आठ वाजेच्या सुमारास हजार आणि पाचशेच्या नोटांबाबत माहिती कळू लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यासंबंधी माहिती देत असल्याचे अनेकांनी टीव्हीवर पाहिले. नोटा बंद झाल्याचे वृत्त आधी फारसे गांभीर्याने न घेणारे अनेक नागरिक रात्री नऊ वाजेच्या सुमारास एटीएमकडे धावले. अनेकांनी आपल्या खिशातील असलेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा खपविण्यासाठी पेट्रोलपंपांकडे धाव घेतली. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्याने शहरात एकच धावपळ माजली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अर्थकारणात ‘भूकंप’ झाला याचीच सर्वत्र चर्चा सुरू झाली. व्हॉटस् अॅपवर मेसेजवर मेसेज पडत होते. पेट्रोलपंप, सीएनजी येथे ५०० व हजार रुपयांच्या नोटा दोन दिवस व्यवहार होऊ शकतात, असे जाहीर करण्यात आल्याने अनेक नागरिकांनी पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी रांगा लावल्या. यामुळे शहरातील बहुतांश पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. काही पेट्रोलपंपवाल्यांनी ५०० व हजार रुपयांच्या नोटा घेण्यास नकार दिला यामुळे वाहनचालक व पंपचालकांमध्ये वादावादी झाल्या. मध्यरात्रीपर्यंत पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा होत्या. अनेकांनी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी धाव घेतली. एरव्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी जास्त रांगा लागत; पण आज ज्या ठिकाणी खात्यात पैसे भरण्याची सुविधा आहे, अशा एटीएमवरही ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. सिडको, हडको, जवाहर कॉलनी, जालना रोड, निराला बाजार, औरंगपुरा आदी ठिकाणच्या एटीएमवर ग्राहकांच्या उड्या पडल्या. ४एटीएममधून नोटा काढण्याचे धाडस कोणी करत नव्हते. कारण, दहा हजारच्या नोटासाठी शंभरच्या पाच नोटा व उर्वरित नोटा पाचशेच्या मिळत होत्या. यामुळे एकाही एटीएमवरून रात्री ८ वाजेनंतर नोटा काढल्या नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.पाचशे, हजार रुपयांच्या नोटांचे बंडलबरोबरच एखाद दुसरी पाचशेची नोट घेऊन आलेल्यांची संख्याही मोठी होती; परंतु नोटा जमा करण्यासाठी प्रत्येकाला तासन्तास रांगेत ताटकळावे लागले.४वृत्तवाहिन्यांच्या माहितीनंतर स्वत:कडील पाचशे, हजार रुपयांची रक्कम घेऊन आपल्या खात्यात जमा करण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी रक्कम जमा करण्याची सुविधा असलेल्या ‘एटीएम’चा शोध घेण्यात अनेक जण एका भागातून दुसऱ्या भागात जात होते. अनेक ठिकाणी लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. ज्यांच्याकडे पाचशेची एकच नोट होती त्यांना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. रात्री उशिरापर्यंत रांगा कायम होत्या. औरंगाबाद : पुंडलिकनगरात एका एटीएमवर नागरिकांची गर्दी उसळली होती. गर्दी एवढी वाढली की, तेथे अनेक जण मधूनच रांगेत घुसण्याचा प्रयत्न करूलागले. यामुळे बाचाबाची सुरू झाली. वातावरण तापत असल्याचे पाहून काही नागरिकांनी पोलिसांना फोन केला. तातडीने तिथे चार्ली आले व त्यांनी गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. नागरिकांची धावपळ एटीएममध्ये पाचशे व हजारच्या नोटा भरण्यासाठी नागरिकांनी घराजवळील एटीएमकडे धाव घेतली. एटीएमवर गर्दी दिसली की ते दुसऱ्या एटीएमकडे जात होते. दुसऱ्या एटीएमवर गर्दी दिसली की, तिसऱ्या एटीएमकडे धाव घेताना नागरिक दिसून आले. काही नागरिक वाहन घेऊन शहराबाहेरील एटीएमकडे जात होते. मोदी सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये एकच धावपळ माजली. तीन तीन तास उभे राहून भरली रक्कम एटीएमबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तीन तीन तास उभे राहून लोकांनी एटीएममध्ये ५०० व एक हजारच्या नोटा जमा केल्या. काही लोकांना एटीएममधून पैसे काढण्याचे माहीत होते पण नोटा भरण्याचे माहीत नव्हते, त्यांनी दुसऱ्यांना विचारून एटीएममध्ये रक्कम कशी जमा करतात हे जाणून घेतले. एटीएममध्ये रक्कम जमा करण्याची अनेकांची पहिलीच वेळ होती... अनेकांच्या गाडीतील पेट्रोल संपले पाचशे,हजारच्या नोटा संपल्यावर अनेकांनी पेट्रोलपंपावर रांगा लावल्या पण रांगा मोठ्या असल्याने त्यातील काही जणांनी एका पेट्रोलपंपावरून दुसऱ्या पेट्रोलपंपाकडे वाहन नेले. काहींचे या दरम्यान पेट्रोल संपले, असे वाहनधारक हाताने गाडी पेट्रोलपंपाकडे ढकलत नेताना दिसून आले. पेट्रोल पंपांवरील नोटा संपल्यापेट्रोल पंपांवर हजार व ५०० च्या नोटा देऊन अनेक जण पेट्रोल भरून घेत होते; पण अनेकांनी या नोटा देऊन १००, २०० रुपयांचे पेट्रोल घेणे सुरू केले; पण यात काही पेट्रोलपंपावरील नोटा संपल्या. अखेर या प्पेट्रोल देणे बंद केले. जे ५०० व हजार रुपयांचे पेट्रोल भरेल त्यांनाच पेट्रोल, डिझेल दिले जात होते. जाधववाडीत अडत व्यापारी हरिश पवार यांच्या दुकानात सायंकाळी मका विक्रीसाठी शेतकरी आले होते. येथे शेतकऱ्यांना गावाकडे नेण्यासाठी ५०० रुपयांच्याच नोटा दिल्या जातात. रात्री आठ वाजता दोन ट्रॅक्टरवरील मका उतरून घेण्यात आला. तेव्हा गावाकडून त्या शेतकऱ्याला फोन आला आणि ५०० व हजार रुपयांच्या नोटा घेऊ नका, असे सांगण्यात आले. ४मका मोजल्यावर शेतकऱ्यास ५० हजार रुपये देण्यासाठी हरिश पवार यांनी पाचशेच्या व हजारच्या बंडल गल्ल्यातून बाहेर काढले. ते पाहून एकदम शेतकरी म्हणाला... अहो, मला ५००, हजारच्या नोटा देऊ नका... आता १००, ५० च्या नोटा नसतील तर १५ दिवसांनी पैसे घ्यायला येतो... असे म्हणून शेतकरी निघून गेला. नोटांंवरील बंदीचा एवढा धसका त्या शेतकऱ्याने घेतला.सोशल मीडियावर मेसेजचा धुमाकूळ४पंतप्रधानांनी हजार व पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची घोषणा करताच शहरात एकच धवपळ उडाली. याचवेळी सोशल मीडियावरही मेसेजचा महापूर आला होता. पैसे असणारांची टिंगल, टवाळी, थट्टा करण्यात येत होती. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राजकीय नेत्यांना टार्गेट करण्यात आले. ‘रद्दीचा भाव काय चालू आहे’,‘आमच्याकडे पाचशे व हजारच्या जुन्या नोटा ९ रुपये प्रतिकिलोने स्वीकारल्या जातील... एक रद्दीवाला’. ‘आज ज्यांना शांत झोप लागणार ते सर्वात श्रीमंत’ असे हास्यांचे फवारे उडवणारे संदेश सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
एका नोटेसाठी तासन्तास ताटकळत एटीएमसमोर गर्दी; पेट्रोलपंपांवरही रांगा
By admin | Updated: November 9, 2016 01:44 IST