ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि.११ : घाटी रुग्णालय परिसरातील निवासस्थानात अनधिकृतरित्या राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने गुरुवारी चांगलाच गोंधळ घातला. या अनधिकृत रहिवाशाल्या निवासस्थान रिकामे करण्याची सूचना करण्यात आली होती. यामुळे निवासस्थानाची तोडफोड करून सदर व्यक्तीने याचा राग व्यक्त केला.
या घटनेमुळे घाटीतील अनधिकृत रहिवाशांची मनमानी समोर आली आहे. घाटीतील निवासस्थानांवर अनधिकृत रहिवाशांनी कब्जा केल्याचे 'लोकमत'ने समोर आणले. या प्रकाराची गंभीर दाखल घेत घाटी प्रशासनाने अशा रहिवाशांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख आणि निवासस्थान वाटप समितीचे अध्यक्ष डॉ.शिवाजी सुक्रे यांनी गुरुवारी परिसरातील निवासस्थानांना भेट दिली. यावेळी निवासस्थान दिलेल्या कर्मचाऱ्यांची यादी आणि प्रत्यक्ष राहणाऱ्यांची यादी पडताळून पाहण्यात आली. यावेळी अनधिकृतरित्या राहणाऱ्यांना निवासस्थान रिकामे करण्याची तंबी देण्यात आली.
बी-२ या इमारतीत अनधिकृतरित्या राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकासही सूचना करण्यात आली होती. त्या प्रमाणे त्याने निवासस्थान रिकामे केले. परंतू जाता जात सदर व्यक्तीने निवास्थानातील किचनमधील फरशांची तोडफोड केली. यामुळे ज्या कर्मचाऱ्यास हे निवासस्थान अधिकृतरित्या मिळणार होते, त्यास त्याचा ताबाच घेता येत नाहीये. लवकरच सदर निवासस्थानाची दुरुस्ती केली जाईल, असे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अनेक वर्षांपासून बस्तानआजघडीला या ठिकाणी अनेक अनधिकृत रहिवाशांनी बस्तान मांडले आहे. यात निवृत्त सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. अनेक वर्षांपासून आम्ही फुकटात राहत आहोत. परंतू आता निवासस्थान रिकामे करणार असल्याचे काहींनी सांगितले.