मराठवाड्यातील भैरवनाथ यात्रा, पैठण यात्रा आणि इतर खेड्यातील लहान-मोठ्या यात्रा होऊन मे महिन्याच्या अखेरीस सर्व कार्यक्रम आवरते घेतले जातात.
मागील वर्षी होळीपासूनच अनेक कार्यक्रम बंद पडले होते. या वर्षीही तशीच परिस्थिती आहे. सलग दुसऱ्यांदा तमाशाचे फड न पडू शकल्याने लोककलावंत मोठ्याच आर्थिक पेचात सापडले आहेत. तमाशाव्यतिरिक्त लग्नसराईनंतर होणारे जागरण गोंधळ, महापुरुषांच्या जयंती, यात्रा, उत्सव असे सगळेच बंद झाल्याने कला सादर करून पोट भरण्याचा पर्यायच खुंटला आहे.
प्रतिक्रिया :
१. दयनीय अवस्था
माझ्यासारख्या वयोवृद्ध कलावंतांना जे मानधन मिळते, त्याचा या काळात त्यांना मोठा आधार वाटतो आहे. पण मध्यमवयीन कलावंतांपुढे मोठा प्रश्न उभा आहे. त्यांनी आजवर केवळ कलाच जोपासली असल्याने शारीरिक श्रम करणे आता त्यांना जमत नाही. अनेकांनी हॉटेलमध्ये, दुकानांमध्ये मिळेल ते काम स्वीकारले होते. परंतु आता पुन्हा लॉकडाऊन लागले आणि होते नव्हते तेही काम बंद पडले. सर्वच कलावंतांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे.
- तुळशीराम यदमाळ, लोककलावंत
२. कला जगणार कशी?
संपूर्ण मराठवाड्यात ८ ते १० हजार लोककलावंत आहेत. अनेक कलाकार अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे काम करता येत नाही. त्यामुळे मोलमजुरीशिवाय दुसरा पर्याय नाही. कलेची किंमत कमी होताना दिसते आहे. पूर्वी जी कला सादर केल्यानंतर हजारो रुपये मिळायचे आता तीच कला अवघे काही रुपये मिळाले, तरी कलाकार सादर करत आहेत. उपासमारीमुळे कलाकारच टिकले नाहीत, तर कला जगणार कशी?
- शाहीर अजिंक्य लिंगायत