लोकमत न्यूज नेटवर्कबीड : औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. याचा तपास सात महिन्यानंतर बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे आला. पथकाने तपासाची चक्रे फिरविली आणि चार महिन्यांत अपहृत मुलीची सुटका केली. मूळची नगरची असणारी मुलगी (१७ वर्षे) ही आई-वडिलांसोबत औरंगाबादला वास्तव्यास आहे. औरंगाबाद येथील एका युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. यानंतर तिच्या नातेवाईकांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सात महिने सातारा पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. त्यानंतर हा तपास बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे आला. या कक्षाच्या प्रमुख फौजदार दीपाली गित्ते यांनी हे.कॉ. अप्पा सानप, रेखा गोरे, नीलावती खटाणे, शेख शमीन, विकास नेवडे यांना सोबत घेऊन या मुलीचा पैठण, अहमदनगर, औरंगाबाद, शेवगाव, कर्नाटक इ. भागांत शोध घेतला. साधारण ४ दिवसांपूर्वी ही मुलगी चेंबूरमध्ये (मुंबई) असल्याची माहिती गित्ते यांना मिळाली. त्यानंतर त्या पथकासह चेंबूरकडे रवाना झाल्या. वेगवेगळ्या वेशात गेलेल्या कर्मचाऱ्यांना एका झोपडीत ही मुलगी सापडली. त्यानंतर त्यांनी तिला ताब्यात घेत औरंगाबादमधील सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले.
औरंगाबादच्या अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका
By admin | Updated: June 6, 2017 00:43 IST