औरंगाबाद: हिंदू धर्माविषयी आणि देवतांविषयी मित्रांच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व एक तरुणीला अश्लील शेरे व कमेंट ऐकविणाऱ्या तरुणांना पोलीस पाठीशी घालत असून त्यांना अटक न करता नोटीस देऊन सोडून दिल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. या प्रकरणात अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा का नोंदविला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात हिंदू धर्माविषयी आणि देवतांविषयी
आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चार आरोपींविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आरोपी मोठ्या घरचे असल्यामुळे पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. कडक कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. या निवेदनावर शैलेश पत्की आणि विवेक बाप्ते यांच्या सह्या आहेत.
अर्थ मुनीश देवपुरी, रितेश जाधव, अंकित अविनाश छकडी आणि आदित्य राजू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आता हे मोबाईल न्याय सहाय्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीपैकी एक तरुण हे आयआयटी पवई येथे शिकत आहे. अन्य दोनजण मुंबईतील झेव्हियर्स कॉलेजमध्ये तर एक जण अमेरिकेत शिक्षण घेतात.
आरोपीनी तक्रारदार तरुणीला उद्देशून अश्लील आणि घाणेरडी भाषा वापरली असताना पोलिसांनी केवळ देवदेवतांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी तक्रारदार तरुणीचा विनयभंग केला असताना गुन्हा नोंदविताना याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. बड्या प्रस्थांची आरोपी मुले असल्याने पोलिसांनी त्यांना अटक न करता त्यांना केवळ नोटीस देउन सोडून देत पाठीशी घातल्याची चर्चा होत आहे. विश्व हिंदू परिषदेने अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
कोट
अटकेची आवश्यकता नाही
धार्मिक भावना दुखावल्या आणि हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना लैंगिक छळाचा प्रकारात मोडत नाही. त्यांचे मोबाइल जप्त केले आहेत. जबाब नोंदविल्यामुळे आरोपींच्या अटकेची आवश्यकता नाही.
- निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त