लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहरातील गणेश नगर भागात राहणारे व भवानी अर्बन को-आॅप. बँकेच्या मुख्य शाखेचे वसुली व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या राहत्या घरावर बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या केली. त्यांच्या दोन्ही मुलींवरह धारदार शस्त्राने बेदम मारहाण केली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ ठोकून होते.आदिनाथ उत्तम घाडगे (५४) व त्यांची पत्नी अलका (४८) या दोघांची चोरांनी हत्या केली. तसेच वर्षा संदीप जाधव (२६) या विवाहित मुलीसह स्वाती घाडगे या दोन मुलींना मारहाण करून गंभीर जखमी केले. घाडगे कुटूंबाने मंगळवारी रात्री सोबत जेवण केले. त्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर सर्वजण झोपले. तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी घराचे दार वाजवले. दार वाजल्याने अलका घाडगे यांनी दरवाजा उघडला. याचवेळी समोरील चोरांनी अलका घाडगे यांच्यावर शस्त्राने हल्ला करीत हत्या केली. तसेच पुढे जाऊन झोपलेल्या अजिनाथ घाडगे यांच्यावरही हल्ला करून त्यांना ठार मारले. विवाहित मुलगी वर्षा संदिप जाधव व स्वाती घाडगे या दोन्ही मुलींना पण पण शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले. सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना चोरांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज घेऊन पोबारा केला.जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी मुलींनी आरडाओरडा करून शेजारच्यांना जागे केले. नागरिकांनी जखमी दोन्ही बहिणींना बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दोघींचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिर, तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, नारायण खटाने आदी अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात याची नोंद झालेली नव्हती.१२ वर्षांपूर्वी पडला होता दरोडा५ जानेवारी २००५ रोजी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या घरी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत रखवालदार लक्ष्मण खटावकर याचा मृत्यू झाला होता. १२ वर्षानंतर पुन्हा जबरी चोरी करताना चोरांनी दाम्पत्याची हत्या करून त्यांच्या दोन मुलींना गंभीर जखमी केल्याची घटना घडली.मांजरसुंब्यात तीन दुकाने फोडलीबीड तालुक्यातील मांजरसुंबा येथेही मंगळवारी रात्री तीन दुकाने फोडून चोरांनी लाखोंचा ऐवज लांबवला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऐन सणासुदीत सुरक्षा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:49 IST