बीड: जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी व आरोपींची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी तयार केला आहे़ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला आरोपींना आणण्यात येते मात्र तेथे त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय नसल्याने पुरुष व स्त्रियांना एकाच शौचालय वापरावे लागत होते. यामुळे महिला आरोपींची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे ज्या पोलीस ठाण्यामध्ये कोठडी आहे त्या ठिकाणी महिला आरोपींसाठी शौचालय बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तयार केला आहे. सदरील प्रस्ताव बांधकाम विभागास सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या बीड शहर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये महिला आरोपींसाठी स्वतंत्र शौचालय वापरास सुरुवात झाली आहे. तर गेवराई व आष्टी येथील पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये महिला आरोपींच्या स्वतंत्र शौचालयासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी शौचालयाची गरज आहे तेथे प्रस्ताव तयार करुन बांधण्यात येतील, असे पोलीस सूत्रांकडून समजते. बीड शहरात पोलिस ठाणे प्रस्तावित बीड शहरात शाहूनगर भागात पोलीस ठाणे प्रस्तावित आहे. यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने त्यासाठी प्रशासकीय मान्यता घेऊनच हा प्रस्ताव तयार होणार आहे. परळी येथे संभाजी नगर पोलीस ठाणे नव्यानेच अस्तित्वात येत आहे. त्यासाठी लागणारे पोलीस बळ पोलीस प्रशासन विभागाकडे असल्याचा दावा अधिकारी करीत आहे. जिल्ह्यासाठी पोलीस भरती करण्यात आली आहे. त्यातील काही नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्त परळी येथील संभाजी नगर पोलीस ठाण्यात करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धाडसत्र सुरुजिल्हा पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या सुचनेनुसार दहा पथकाद्वारे मटका, अवैध दारु विक्री व वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सत्र सुरु आहे. दहा पथकांनी गेल्या चार दिवसात जवळपास ८० ठिकाणी कारवाई केली असल्याने मटका बहाद्दरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. मटका बुकीवर कारवाई केल्यानंतर तो कोणासाठी मटका घेत आहे त्याचेही नाव फिर्यादीत समाविष्ट करण्यात येत आहे. त्यावरुन जिल्ह्यातील दिग्गज मटका बहाद्दरावर कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. दहा पथका वेगवेगळया भागात जाऊन कारवाई करत असल्याने धाडसत्र योग्य पद्धतीने पार पडत असल्याने कारवाईचा आकडा वाढत चालला आहे.पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार प्रत्येक दिवशी पत्रकातील अधिकारी वेगवेगळ्या भागात जाऊन धाडी टाकत असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात मटका चालविणाऱ्यांना चपराक बसविली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींसह मटका चालकाचाही समावेश करण्यात येत असल्याने अनेकजणांनी अवैध धंदे बंद केले आहेत. (प्रतिनिधी)पुढचे पाठ, मागचे सपाटपाटोदा: पोलिस अधीक्षकांच्या सुचनेनुसार मटका चालक व अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची बाब खरी असली तरी कारवाई नंतर त्याच भागात पुन्हा दारु विक्री होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात पोलिस विभागाने पाटोदा तालुक्यात दहा ठिकाणी धाडी टाकल्या. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मात्र पुन्हा ज्या भागात कारवाई करण्यात आली आहे त्याच ठिकाणी अवैधरीत्या दारु विक्री करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पुढचे पाट, मागचे सपाट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातून अवैध धंदे बाहेर होतील कि नाही याची शाश्वती सध्या तरी देता येणार नाही हे निश्चित
महिला पोलिसांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था
By admin | Updated: July 10, 2014 00:57 IST