औरंगाबाद : काँग्रेस सेवा दल आणि युवक काँग्रेसतर्फे शुक्रवारी महागाईविरोधात दोन वेगवेगळी सायकल रॅली काढण्यात आली होती. शहरात लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सेवादल आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा आणि शहर काँग्रेसतर्फे महागाईविरोधात नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. यानंतर काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून सायकल रॅली काढण्यात आली होती. यात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती होती. यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काेरोना साथ रोगासंदर्भात लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक सय्यद मोहसीन अली अझहर यांच्या फिर्यादीवरून २० ते २५ जणांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये अलताफ लतिफ पटेल, विलास औताडे, नीलेश पवार, डॉ. प्रल्हाद काळे, अरुण शिरसाठ यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दुसरी सायकल रॅली युवक काँग्रेसतर्फे गांधी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यलयावर काढण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुजफ्फर खान पठाण, पंकज ठोंबरे, गौरव जैस्वाल, नीलेश आंबेवाडीकर, जितेंद्र देहाडे यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
चौकट,
वरिष्ठांच्या आदेशानुसार करवाई करणार
काँग्रेस सेवा दल आणि युवक काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या महागाई विरोधातील सायकल रॅलीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याविषयी सिटी चौकचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांना विचारले असता, त्यांनी दोन्ही रॅलीतील आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात इतर २० ते २५ जणांचा समावेश आहे. चौकशीत आढळून आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार इतरांच्या नावांचा समावेश केला जाईल.