उस्मानाबाद : तालुक्यातील वाघोली शिवारातील विहिरीत युवतीचा खून करून प्रेत फेकून दिल्या प्रकरणात पोलिसांनी वाघोली येथीलच दत्ता लोहार या युवकाला अटक केली आहे़ त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी दत्ता लोहार हा नागपूर येथून अटक करण्यात आलेला प्रकाश सूर्यकांत चाफेकर याचा मेहुना असल्याचे समजते़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१५ मध्ये वाघोली शिवारातील विहिरीत एका युवतीचा मृतदेह आढळला होता़ ग्रामीण पोलीस खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिने या प्रकरणात कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती आले नव्हते़ सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्याकडे हा तपास आल्यानंतर अत्याधुनिक पध्दतीने तपास यंत्रणा राबवून त्यांनी मुलीच्या अंगावरील ड्रेसवरून प्रकाश सूर्यकांत चाफेकर (रा़पुणे) याला नागपूर येथून जेरबंद केले होते़ त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ तर या प्रकरणात पोलिसांनी वाघोली येथील दत्ता लोहार या युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते़ त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले़ पोलिसांनी लोहार याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २२ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ या प्रकरणात आणखी किती आरोपी जेरबंद होतात ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)
खून प्रकरणात आणखी एक अटकेत
By admin | Updated: June 18, 2016 00:53 IST