औरंगाबाद : अल्पावधीत अडीच पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने पकडून आणलेल्या आरोपीची आज न्यायालयाने हर्सूल कारागृहात रवानगी केली.कैलास गजानन महाजन (रा. लोणार, ह. मु. रिसोड,अकोला) असे या आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, सुपर पॉवर कंपनीचा प्रमुख दीपक पारखे, त्याची पत्नी दिव्या पारखे, कंपनीचे कोअर कमिटी सदस्य बाळासाहेब सुदामराव जाधव, बाळासाहेब मुरलीधर यादव (रा. बोर रांजणी, ता. घनसावंगी, जालना), दत्तात्रय प्रभाकर मापारी (रा. लोणार, जि. बुलडाणा) आणि प्रकाश बापूराव जल्हारे (३०, रा. शंकरनगर, हमालवाडी, परभणी) हे आरोपी यापूर्वीच हर्सूल कारागृहात आहेत. आज कारागृहात पाठविण्यात आलेल्या कैलासमुळे आता सुपर पॉवर घोटाळ्यातील आरोपींची संख्या १३ झाली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून एक कार आणि चार कॉम्प्युटर जप्त केले आहेत. महाजन हा कंपनीच्या लोणार शाखेचा प्रमुख होता. कंपनीचा घोटाळा उघडकीस आल्यापासून तो फरार झाला होता. तो रिसोड येथे लपून बसल्याचे समजताच पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक कृष्णा पाटील, उपनिरीक्षक विश्वास पाटील, सुभाष खंडागळे आदींनी १६ डिसेंबर रोजी त्यास पकडून आणले.त्याची पोलीस कोठडी आज सोमवारी समाप्त झाली. तेव्हा त्यास पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात पाठविले. महाजन विरोधात मध्य प्रदेशातील नेपानगर येथेही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
आणखी एका आरोपीची कारागृहात रवानगी
By admin | Updated: December 23, 2014 00:27 IST