लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि उदगीर येथील विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपल्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १६ जुलै रोजी नूतन नगराध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. तर अहमदपूर नगराध्यक्षांची मुदत आॅगस्टमध्ये संपणार आहे. त्यामुळे या तीन पालिकांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.औसा पालिकेचे नगराध्यक्षपद एससी महिलेसाठी आरक्षित असून, निलंगा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तर उदगीर पालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. या आरक्षणानुसार १६ जुलै रोजी सकाळी १२ वाजता त्या-त्या नगरपालिकांच्या सभागृहात सर्वसाधारण सभा होऊन नूतन नगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. औसा पालिकेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, निलंगा पालिकेसाठी उपविभागीय अधिकारी ए.बी. मोहेकर आणि औसा पालिकेसाठी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या तिन्ही पालिकांच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ २२ जून २०१४ रोजी संपलेला आहे. शासनाने सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली होती. परंतु, ही मुदतवाढ शासनाने ५ जुलै रोजी रद्द केली. त्यामुळे या तिन्ही पालिकांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार १६ जुलै रोजी या आरक्षणानुसार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत, अशी माहिती नगरविकास विभागाचे सतीश शिवणे यांनी दिली.अहमदपूर नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ आॅगस्टमध्ये संपणार आहे. त्यामुळे ही पालिका वगळता औसा, निलंगा आणि उदगीर पालिकेतील नगराध्यक्ष पदांसाठी ही निवडणूक लागली आहे. सध्या औसा पालिकेत एससी महिला, निलंगा पालिकेत सर्वसाधारण महिला व उदगीर पालिकेत सर्वसाधारण पुरुष नगराध्यक्ष आहेत. तेच आरक्षण पुढील अडीच वर्षांसाठी राहणार असल्याचेही शिवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर
By admin | Updated: July 8, 2014 00:58 IST