लातूर : महानगरपालिकेच्या वतीने ऐन दुष्काळात मालमत्ता कराची वसुली सुरू केली असून, थकित आणि चालू बिलावर मोठा दंड आकारला जात आहे. एक वर्षाच्या थकित करासाठी २४ टक्के व्याज तर चालू बिलावर २ टक्के व्याज आकारून मालमत्ता कर वसुलीचा धडाका मनपाने सुरू केला आहे. दरम्यान, शहरातील ८ हजार ९७२ थकबाकीदारांना आतापर्यंत मनपाने नोटीसा बजावल्या असून, आठ दिवसात कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्यात येईल, अशी धमकीही दिली आहे. त्यामुळे मालमत्ताधारक धास्तावले आहेत.लातूर शहरात घरगुती आणि व्यावसायिक ७० हजार मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडे मालमत्ता कराची ६५ लाखांची थकबाकी आहे. चार ते पाच वर्षांपासून कर न भरलेल्या मालमत्ताधारकांची संख्या १३ हजार आहे. यातील ८ हजार ९७२ जणांना मनपाने नोटिसा पाठविल्या आहेत. आठ दिवसात कर न भरल्यास आपली मालमत्ता जप्त करण्यात येईल, असे या नोटिसीत म्हटले आहे. ऐन दुष्काळात या नोटिसा आल्यामुळे मालमत्ताधारक धास्तावले आहेत. पाणी नाही, कचऱ्याची सोय लावली जात नाही, अन्य नागरी सुविधा नाहीत, तरी मनपाने या नोटिसा पाठवून शहरातल्या नागरिकांना वेठीस धरले आहे. विशेष म्हणजे ज्यांची एक वर्षांपासून थकबाकी आहे, त्यांच्या बिलावर २४ टक्के व्याजासह दंड आकारण्यात आला आहे. शिवाय, ज्यांची चालू वर्षाची थकबाकी आहे. त्यांच्या बिलावरही २ टक्के व्याजाची आकारणी केली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाण्यासाठी भटकंतीची वेळ आणलेल्या मनपाने वसुलीसाठी तगादा लावल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. मालमत्ता करात शिक्षण, शौचालय, वृक्ष, अग्नी, मनपा शिक्षण, पथ, स्वच्छता आदी कर लावण्यात आले आहेत. तर व्यावसायिक करात प्रस्तुत सर्व कराबरोबर रोजगार कर लावण्यात आला आहे. या सर्व कराच्या वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ झोन मध्ये चार पथक स्थापन केले आहेत. या पथकामार्फत वसुली करण्यात येत आहे. भोंगा लावून मालमत्ता कर वसुलीची मोहीम प्रत्येक वॉर्डात राबविली जात असल्याने नागरिकांना जप्तीची भिती वाटत आहे. प्रत्येक प्रभागात भोंग्याद्वारे कर भरा अन्यथा जप्ती केली जाईल, अशी सूचना दिली जात असल्याने नागरिकांत भीती वाढली आहे. (प्रतिनिधी)
ऐन दुष्काळात मालमत्ता कराचा तगादा
By admin | Updated: March 1, 2016 00:42 IST