गंगाराम आढाव , जालना गेल्यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळासह टंचाईच्या स्थितीत संपूर्ण जालनेकरांना दिलासा देणार्या जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनेस बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून जायकवाडी -जालना पाणी पुरवठा योजना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर व अनंत अडचनीवर मात करीत पूर्ण झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे,माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्यासह आ. कैलास गोरंट्याल यांचे योजना मार्गी लागण्यासाठीचे विशेष प्रयत्न पूर्ततेसाठी कारणीभूत ठरले. ७ मे २०१३ रोजी या योजनाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. या लोकार्पण सोहळ्यास बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या जिल्ह्यात गेल्या वर्षी भीषण दुष्काळ पडला होता. विशेषत: शहरासह जिल्ह्यातील सर्व पाणीसाठे कोरडेठाक पडले होते. जमिनील पाणी पातळीही पूर्णत: खालावली. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात भीषण टंचाई उद्भवली. जालना शहरवासियांनी तर फेब्रुवारी महिन्यापासून टंचाईच्या झळा सोसल्या. महिनोन्महिने पाणीपुरवठा न झाल्याने जालनेकर पाण्याने व्याकुळ बनले होते. या स्थितीत जालनेकरांनी मोठ्या यातना भोगल्या. पिण्यासह सांडपाण्यासाठी जालनेकरांना दररोज पैसे मोजावे लागले. श्रीमंतापासून ते गोरगरिबांनाही खरेदी केल्यावर पाण्यावरच तहान भागवावी लागली. या स्थितीत अख्खा उन्हाळा कसा काढावा या विवंचनेत सापडलेल्या जालनेकरांनी जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनाच एकमेव आशादायी होती. परंतु या योजनेचे हे काम रखडल्याने पाणी मिळेल की नाही अशी भीती निर्माण झाली. परंतु आ. कैलास गोरंट्याल यांनी आंदोलनाचा मार्ग पत्कारुन सरकारी दरबारी दबाव आणला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेतील अडथळे दूर करीत योजना युद्ध पातळीवर कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. अखेर रखडत का असेलना या योजनेचे पाणी ७ मे रोजी जालनापर्यंत पोहचले. मुख्यमंत्री चव्हाण व उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकापर्ण सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे संपर्क नेते तथा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह अन्य उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण यांनी हा ऐतिहासिक क्षण उल्लेख करीत जालनेकरांच्या दारात आलेले पाणी घरा- घरात पोहोचण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी करीता मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासन पाळलेसुद्धा मुख्यमंत्री निधीतून ७ कोटी ६४ लाख रुपयांपैकी २ कोटी ८४ लाख २८ हजार रुपयांचा निधी अंतर्गत जलवाहिनीसाठी प्राप्त झाला. त्यातून शहरातील ३८ वस्त्यामधील अंतर्गत जलवाहिनीचे काम करण्यात येत आहे. त्यातील काही कामे पूर्ण झाली आहे तर काही बाकी आहेत. जायकवाडी - जालना या योजनेतून शहरापर्यंत पाणी पोहोचल्यानंतर जालनावासियांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या भीषण टंचाईच्या स्थितीत त्याचे महत्त्व अनन्य साधारण होते. यावर्षी तेवढ्या तीव्रतेने टंचाईच्या झळा पोहोचल्या नाहीत. जायकवाडी- जालना योजना त्यास कारणीभूत आहे. त्याचबरोबर यावर्षी पडलेल्या समाधानकारक पावसासह घाणेवाडीसह इतर अन्य प्रकल्पांतील पुरेसा पाणीसाठा तसेच जमिनीतील पाणी पातळीतील वाढही साह्यभूत ठरली आहे. त्यामुळे मागील वर्षा इतकी भीषण टंचाई यावर्षी त्या तुलनेत जाणवत नाही हे वास्तव आहे. आनंद व नाराजी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी जालनेकराच्या दारात आलेले पाणी घरा- घरात पोहोचण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अंतर्गत जलवाहिन्यांसाठी २ कोटी ८४ लक्ष रूपयाचा निधी सुद्धा दिला. वर्ष होत असतानाही अनेक ठिकाणच्या जलवाहिन्यांचे काम झालेले नाही. तसेच पालिकेच्या नियोजना अभावी जालनेकरांना पाण्यासाठी १५ - १५ दिवसाची वाट पाहावी लागत आहे. पाणी असून ही महिन्यातून दोन वेळा पाणी देण्यात असल्याने जालनेकरात पाणी दारात आल्याचा आनंद आहे. मात्र घरात येत नसल्याने नाराजी आहे.
जायकवाडी-जालना योजनेस वर्षपूर्ती
By admin | Updated: May 7, 2014 00:25 IST