जालना: तब्बल तीन तास प्रतीक्षा करूनही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त प्रवांशानी गुरूवारी रात्री जालना बसस्थानकाचे मुख्यप्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले. तासभर आंदोलन केल्याने बस स्थानकात येणाऱ्या व येथून जाणाऱ्या बसेस खोळंबल्या होत्या. त्यामुळे बसस्थानक व बाहेर रस्त्यावर भोकरदननाकापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.जालना तालुक्यात सेवली, सरकटे वझर येथे मुक्कामी जाणारी बस जालना स्थानकातून सायंकाळी ५.१५ वाजता सोडण्यात येते. तसेच जालना- घनसावंगी ही घनसावंगीला मुक्कामी जाणारी बस सायंकाळी ६. १५ वाजता जालना येथून सोडण्यात येते. या दोन्ही बसेस शेवटची असल्याने दोन्ही ठिकाणच्या रस्त्यावरील सुमारे २५ गावांतील शंभर ते दीडशे प्रवासी व काही विद्यार्थी, विद्यार्थिनी जालना स्थानकात या बसेसची वाट पाहत बसले होते. मात्र या दोन्ही ठिकाणी जालन्याहून परत त्या त्या गावाला जाणाऱ्या दोन्ही बसेस रस्त्यातच नादुरूस्त झाल्या होत्या.घनसावंगीकडून जालन्याकडे येणारी बस क्रमांक १९३३ ही तळेगाव (ता. घनसावंगी ) जवळ नादुरूस्त झाली. तर सेवली, वझर सरकटे कडून येणारी बस नेर गावा जवळ नादूरूस्त झाली होती. या दोन्ही बसची वाट पाहत जालना स्थानकात बसलेल्या प्रवाशांनी दीड तास प्रतिक्षेनंतर अगोदर रात्री ७ वाजता डेपोतून स्थानकात प्रवेशासाठी असलेले गेट लावले. मात्र तरीही आगारप्रमुख व वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने रात्री ९ च्या सुमारास स्थानकाचे गेट लावून सर्व प्रवाशी गेटवर बसले होते. त्यामुळे बस स्थानकात येणाऱ्या व स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसची वाहतूक ठप्प झाली होती. साडेनऊ वाजेच्या सुमारास भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवींद्र राऊत, मयूर ठाकूर, रवि कटारे आदींनी एसटीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना बोलून तात्काळ दोन्ही ठिकाणच्या बसेसचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच प्रवाशीही संतप्त झाले होते. दोन्ही बस लागत नाही. तोपर्यंत गेट उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. अखेर रात्री ९.५० वाजता अगोदर सेवली बस नतर १० वाजता घनसावंगी बस सोडण्यात आली. दरम्यान, मुक्कामी बसेस जालना स्थानकातून कधीच वेळेवर सोडण्यात येत नाही. सोडल्यातरी खटाऱ्या बसेस असतात त्या रस्त्यातच बंद पडून प्रवाशांची गैरसोय होते. आज तसेच झाले असल्याचे राजेंद्र कोटेचा,अनिल मुंडे, संगीता खराडे, शंकर पंडीत, सोमनाथ घायाळ, राजेंद्र जाधव, गोपाल ढेंगळे, उद्धव थोरात, गजानन नरवडे, भगवान जाधव, नानाभाऊ जाधव, गंगू ठेंगडे, चंद्रशेखर कारेगावकर,अन्नू तांबोळी या प्रवाशांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संतप्त प्रवाशांनी बसस्थानकाचे लावले गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 00:22 IST