भोकरदन : शहरातील खंडोबा गल्लीसह परिसरात मागील दोन ते तीन महिन्यांपासून नळाला थेंबभरही पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या वंदना हजारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी गणेश लेकुरवाळे व त्यानंतर नगराध्यक्षांचे पती मुकेश चिने यांना घेराव घातला.संतप्त महिलांना लगेचच पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन या दोघांनी देऊन महिलांची बोळवण केली परंतु सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा न झाल्यास पालिकेत ठिय्या आंदोलन करू अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली.शहरातील खंडोबागल्ली, प्रशाद गल्ली, धोबीगल्ली आदी भागात नळांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रसंगी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. टँकरचालकही अडवणूक करीत असून, वारंवार दर वाढवित आहेत. वेळेत पुरवठा करत नाहीत, त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारी या महिलांनी केल्या. दरम्यान खंडोबा गल्लीतील महिला नगर परिषदेत दाखल झाल्या. मात्र, मुख्याधिकारी सय्यद रफीक कंकर हजर नव्हते. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा महिलांनी प्रयत्न केला. परंतु नेहमीप्रमाणे त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर पाणीपुरवठा अधिकारी लेकूरवाळे, मुकेश चिने यांच्याकडे महिलांनी आपला मोर्चा वळविला. त्यांच्याकडून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मिळाले.यावेळी वंदना हजारे, रेखा मैंद, छाया मैंद, लीलाबाई शिंदे, मिना तळेकर, आशा ढवळे, मीनाबाई सोनवणे, गावंडे, सनान्से, कविता हजारे, आशा मैंढकर, लता मैंद, लता तळेकर, किर्ती दामोधर, विमल शर्मा आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)गेल्या आठवड्यात जलवाहिनी अंथरण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम तात्काळ सुरू होणे अपेक्षित असतांना त्याकडे मुख्याधिकाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. दोन दिवसापूर्वीच या खड्ड्यात रूखमणबाई तळेकर या वृद्ध महिला पडल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या.
संतप्त महिलांचा पाण्यासाठी घेराव
By admin | Updated: June 12, 2014 01:40 IST