बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन थेट बँक खात्यात करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे बँक खात्यावर एक रुपया जमा न झाल्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन हजार अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मे व जून महिन्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही.अंगणवाडी सेविकांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी पीएफएमएस प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याकरिता राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे राष्ट्रीयीकृत बँक खाते क्रमांक, आधारकार्ड, बँकेचा आयएफसी कोड आदी माहिती संकलित करण्यात येत आहे. बहुतांश अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी आवश्यक सर्व माहिती संबंधित विभागाकडे जमा केली आहे. मानधनाची पूर्ण रक्कम एकत्रित जमा करण्यापूर्वी प्रयोगिक तत्त्वावर बँक खात्यात एक रुपया पाठवायाचा, तो खात्यात जमा झाल्याची खात्री झाल्यानंतरच संपूर्ण मानधनाची रक्कम आॅनलाइन जमा करायची, असा निर्णय घेण्यात आला. आधारकार्डवर बदललेले नाव, दोन बँक खात्याशी संलग्न झालेला एकच आधार क्रमांक, बँकेचा आयएफसीकोडचा अभाव, राष्ट्रीकृत बँकेत खाते उघडण्यास होणारा विलंब आदी कारणांमुळे जिल्ह्यातील पन्नास टक्के अंणवाडी सेविकांच्या खात्यात एक रुपया जमा झालेला नाही. मानधन जमा करण्यासाठी दिलेल्या खात्याऐवजी प्रयोग म्हणून पाठविण्यात आलेला रुपया दुसऱ्याच आधारसंलग्न खात्यावर जमा झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल तीन हजार ४२३ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे दोन महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. परिणामी त्यांना अडचणींना समोरे जावे लागत आहे.
अंगणवाडी सेविका दोन महिने मानधनाविना
By admin | Updated: July 11, 2017 00:15 IST