लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली/बासंबा : हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागातील माऊली नगर येथील गणेश श्रीकृष्ण शिंदे या युवकाचे १९ आॅगस्ट रोजी रात्री ९.३०च्या सुमारास अपहरण झाल्याची घटना घडली होती याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आता अपहरणकर्ते १ लाख रुपयाची मागणी करीत असल्याचे युवकाचे वडील श्रीकृष्ण शिंदे यांनी सांगितले.गणेश शिंदे हा एटीएम मधून पैसे काढण्यासाठी हिंगोली शहरात आला होता. तर त्याला दोन ते तीन जणांनी पकडल्याचे गणेशनेच त्याच्या वडिलांना सांगितले. तर दोन लाख रुपयाची मागणी केली जात असल्याने ‘तुमच्याच खात्यात २ लाख रुपये टाकण्याचे’ अपहरणकर्ते सांगत असल्याचे मुलाने सांगितले. तसेच अपहरणकर्तेही युवकाच्या वडिलांशी बोलले. तर १० ते १५ मिनिटाला वारंवार फोन करीत फिल्मी स्टाईलने पैशाची मागणी करीत आहेत. तर २० आॅगस्ट रोजी सकाळी वडिलांनी पुन्हा ५ हजार रुपये खात्यावर जमा केले असता त्यातील ३ हजार ३०० रुपये नांदेड येथील पंजाब नॅशनल बँकेतून काढल्याचा एसएमएस आला. आता ५० हजार रुपये लवकर जमा करा अन्यथा तुमच्या मुलाचे कान, नाक कापून व्हॉटस्अॅपवर टाकतो अशी धमकी दिली. त्यामुळे मुलाचे आई- वडील भयभीत झाले आहेत. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरु आहे. तर पोलिसांकडून मिळत असलेल्या लोकेशननुसार युवकाचे नातेवाईकही नांदेड शहर व इतर ठिकाणे पिंजून काढत आहेत.
...अन् आता केली लाखाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:13 IST