लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असलेले दादर येथील आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना अटक झालीच पाहिजे, तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या संपूर्ण कामकाजाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, या व अन्य मागण्यांसाठी रविवारी औरंगाबादेत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा निघण्यापूर्वी पावसाच्या शिडकाव्याने मोर्चेकऱ्यांचे स्वागत केले. हातात निळे, लाल व पंचशील झेंडे घेऊन भर पावसातही कार्यकर्ते बाबासाहेबांचा जयघोष करीत मोर्चात सहभागी होत होते.दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या घटनेला आज २५ जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. यासंदर्भात तक्रार दाखल असतानादेखील पोलिसांनी आजपर्यंत दोषींवर कारवाई केलेली नाही. या निषेधार्थ भारिप- बहुजन महासंघ व डाव्या परिवर्तनवादी पक्ष- संघटनांच्या वतीने रविवारी औरंगाबादेत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भारिप- बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा, लाल निशाण पक्ष, पँथर्स सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन, मराठवाडा लेबर युनियन, आॅल इंडिया युथ फेडरेशन आदींसह समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. अॅड. बी. एच. गायकवाड यांच्या हस्ते क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. विद्रोही जलसा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गायलेली क्रांती गीते हेच मोर्चाचे आकर्षण ठरले. रत्नाकर गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांचे समूह चौकाचौकातून मोर्चात सहभागी होत होते.
आंबेडकर भवन बचाव; शहरात उत्स्फूर्त मोर्चा
By admin | Updated: June 26, 2017 00:52 IST