अंबाजोगाई : डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या अंबाजोगाई शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जागा अपुरी पडू लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान मांडल्याने डेंग्यू अंबाजोगाईकरांचा पिच्छा सोडेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यू सदृश्य आजाराने रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तीन महिन्यांत साठपेक्षा जास्त रुग्णांवर डेंग्युंचे उपचार करण्यात आले आहेत. अजूनही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सातत्याने रुग्ण उपाचरासाठी येत आहेत. याशिवाय ताप, सर्दी व विषाणू संसर्गाच्या आजारांचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने खाट अपुरे पडू लागले आहेत. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, डेंग्यूसदृश्य रुग्णात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. आजतागायत साठपेक्षा जास्त रुग्ण डेंग्यू असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. शहरात स्वच्छता मोहिम राबवा अंबाजोगाई शहरात रामदास नगर, भट्ट गल्ली, रविवारपेठ, सदर बाजार, बलुत्याचा मळा, कुत्तरविहिर अशा विविध ठिकाणी डेंग्यू सदृश्य आजाराचे अनेक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. येथील रामदास नगर परिसरात तर नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने व ठिकठिकाणी गटारात घाण पाणी साठल्याने मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही स्वच्छता मोहीम राबवली जात नाही. परिणामी याचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशी प्रतिक्रिया विनायक रामदासी, मोरेश्वर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्याकडे विचारणा केली असता शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असून डेंग्यू सदृश्य आजाराला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)