औरंगाबाद : कोरोनामुळे सलग १३ महिने बंद असलेले खासगी कोचिंग क्लासेस व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. १० मेपासून त्यांना कोरोनाचे नियम पाळून क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी द्या, तसेच आर्थिक मदत करा, अशी मागणी मुख्यमंत्री, राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
१३ महिन्यांपासून खासगी शिकवणी क्लासेस बंद असल्याने क्लासेसचे भाडे, घरभाडे, बँकेचे हप्ते थकले आहेत. घरखर्च, मुला-मुलींचे शैक्षणिक शुल्क, औषधोपचाराच्या खर्चांसाठी आर्थिक चणचण आहे. त्यामुळे मदत व पुनर्वसन अंतर्गत शासनाने खासगी कोचिंग क्लासेस व खासगी शिकवणी घेणारे शिक्षक व प्राध्यापक यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात द्यावी. कोरोना निर्देशांचे पालन करून एका बाकावर एक विद्यार्थी बसवून स्वच्छतेची काळजी घेऊन पालकांचे हमीपत्र घेऊन येत्या १० मेपासून दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी; अन्यथा राज्यभरातील खासगी कोचिंग क्लासेस संचालक, खासगी शिकवणी घेणारे शिक्षक, प्राध्यापक हे पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.