बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम सुरू असून, या अंतर्गत ओआरएस व झिंक गोळ्या मोफत उपलब्ध झाल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.११ ते २३ जुलै दरम्यान हा पंधरवडा पार पडत आहे. या अंतर्गत अतिसारापासून संरक्षण करण्यासाठी पाच वर्षे वयोगटापर्यंतच्या बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची सूचना आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी जि.प.मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांपासून बचावासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अस्वच्छतेमुळे अतिसार होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर लहान बाळांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना डॉ. सांगळे यांनी दिल्या.अतिसार झाल्यास दूध, पातळ पदार्थ व खाद्य पदार्थ खाण्यास द्यावेत. जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुवावेत. शौचानंतर बाळाला स्वच्छ करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. अतिसार बरा झाला तरीही दोन आठवड्यापर्यंत झिंक गोळ्यांची मात्रा द्यावी, अशा सूचना आहेत. (प्रतिनिधी)
अतिसार नियंत्रणासाठी सतर्कतेच्या सूचना
By admin | Updated: July 12, 2016 01:00 IST