मोहन बोराडे , सेलूलोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्यांची पक्षाला गरज नाही. त्यामुळे आताच त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करावी, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे आयोजित निर्धार मेळाव्यात दिल्याने लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम केलेले स्थानिक नेते चांगलेच घायाळ झाल्याचे पहावयास मिळाले.सेलूत येथील श्रीराम प्रतिष्ठाणच्या विद्याविहार संकुलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हा निर्धार मेळाव्याचे आयोजन ५ आॅगस्ट रोजी करण्यात आले होते त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते़ यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री सुरेश धस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ विक्रम काळे, अॅड़ गणेशराव दुधगावकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ रामराव वडकुते, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जू लाला, डॉ़ मधुसूदन केंद्रे, डॉ़ संजय रोडगे, राजेश विटेकर, सुरेश जाधव, बाळासाहेब जामकर , सारंगधर महाराज, अशोक काकडे, विनायक पावडे, राजेंद्र लहाने, प्रसाद बुधवंत, अजय चौधरी, माऊली ताठे, प्रताप सोळंके, अॅड़ रामेश्वर शेवाळे, सुरेश भुमरे आदींची उपस्थिती होती़उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काहींनी काम केले. विरोधात स्पर्धक उमेदवाराला मतदान करण्याचे फोन केले गेले. अशांनी आताच त्यांच्या कामात सुधारणा करावी, असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला. यामुळे पक्षविरोधी काम केलेल्या पक्षातील काही नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले. पवार म्हणाले, केंद्राच्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली. त्याबाबत महाराष्ट्रातील खासदार गप्प राहतात़ मात्र खराब चपाती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्यांच्या तोंडात ती कोंबतात. मोदी लाटेत निवडून आलेल्या महायुतीच्या खासदारांना कुठलाही अनुभव नाही़ रेल्वे प्रश्नासाठी या खासदारांनी काय केले, असा सवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित करून केंद्र सरकारवर टीका केली. ‘अच्छे दिन आने वाले है’ हे म्हणणारे आज कुठेही दिसत नाहीत. सत्तेत आल्यानंतर भाजपाने सर्वत्र महागाई करून लोकांची दिशाभूल केली. भाजपाला निवडणुकीत बहुजन चेहरा लागतो. मात्र सत्ता येताच दुसरेच चेहरे समोर येतात़ मूठभर लोकांचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवील़ पंतप्रधान नेपाळला आर्थिक मदत देतात मात्र येथील शेतकऱ्यांना मदत देत नाहीत, असा आरोप करून अजित पवार यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. प्रास्ताविक प्रदेश चिटणीस डॉ़ संजय रोडगे यांनी केले.
स्थानिक नेत्यांना अजित पवारांची तंबी
By admin | Updated: August 6, 2014 02:23 IST