लोकमत न्यूज नेटवर्कफर्दापूर : एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे सलग तिस-या दिवशीही अजिंठा लेणीत पर्यटकांचे हाल झाले. प्रशासनाने खाजगी वाहनाला बंदी करून खाजगी चालक बसवून एसटीच्या काही फे-या लेणीत केल्या.बुधवारी खाजगी बसचालकांनी मनमानीपणे भाडे वसूल करून पर्यटकांची लूट केल्याने गुरुवारी प्रशासनाने पुन्हा एक वेळ खाजगी चालकांच्या माध्यमातून फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणीदरम्यान एसटीच्या बस चालविण्याचा निर्णय घेतला. मात्र सकाळी १०.४५ वाजेपर्यंत या गाड्या सुरू न झाल्याने पर्यटकांचे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. दुपारी एसटीने खाजगी चालकांच्या माध्यमातून काही फे-या लेणीत केल्या. परंतु अर्धवट सेवा मिळाल्याने पर्यटकांची गैरसोय झाली.एसटीच्या संपामुळे मंगळवारी पर्यटन महामंडळाने खाजगी बसच्या माध्यमातून अजिंठा लेणीत सेवा देण्याचा प्रयत्न केला, मात्र या खाजगी बसचालकांनी मनमानीपणे भाडे वसूल करत पर्यटकांची लूट सुरू केल्याने पर्यटकांनी निषेध व्यक्त केला होता. गुरुवारीही काही पर्यटकांनी बैैलगाडीतून तर काहींनी पायीच अजिंठा लेणीचा प्रवास केला. एमटीडीसीच्या नियोजनशून्य कारभाराचा पर्यटक दिवसभर निषेध करताना दिसले.
अजिंठा लेणीत तिस-या दिवशीही पर्यटकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:38 IST