पालम : तालुक्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ५० टक्के सवलतीची कृषी संजीवनी योजना सुरू आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पालम कार्यालयाकडून करण्यात आले आहे. पालम तालुक्यात कृषीपंपांची संख्या ५ हजार ८५२ एवढी आहे. या कृषीपंपधारकाकडून वीजबिलापोटी १२ कोटी ५७ लाख रुपयांचे येणे बाकी आहे. या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी वीज कंपनीने थकबाकीची सवलत देण्यासाठी कृषी संजीवनी योजना २०१४ सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांसाठी ५० टक्के रक्कमेत सवलत देण्यात आली आहे. तसेच ही रक्कम तीन हप्त्यामध्ये भरण्याची ग्राहकांना सवलत आहे. ३१ मार्च २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंडाची रक्कम वीज वितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी ५० टक्के मूळ रकमेची एकरकमी रक्कम भरता येईल. या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना फायदेशीर आहे. पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना योजनेची माहिती व्हावी, यासाठी कंपनीतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. कृषी संजीवनी योजना अधीक्षक अभियंता निर्मले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या योजनेचा थकबाकीदार शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता मठपती व सर्व कर्मचाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)४३३ कोटी ७८ लाखांची थकबाकी जिल्ह्यातील कृषीपंपांची थकबाकी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- गंगाखेड - ३३ कोटी ७८ लाख, जिंंतूर ७५ कोटी ७४ लाख, मानवत- ४० कोटी १९ लाख, पालम- २३ कोटी ३८ लाख, परभणी ग्रामीण ७८ कोटी ९६ लाख, परभणी शहर २ कोटी ९४ लाख, पाथरी ४६ कोटी ८३ लाख, पूर्णा ४२ कोटी ५० लाख, सेलू ४९ कोटी ९५ लाख व सोनपेठ १९ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी योजनेंतर्गत कृषीपंपांची थकबाकी भरून लाभ घ्यावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीकडून अल्पभूधारक व बागायतदार शेतकऱ्यांसह सरसकट सर्वांनाच समान कृषीबिल दिले जात आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना वीजबिलाचा नाहक फटका बसत आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना
By admin | Updated: July 31, 2014 00:41 IST