कडा: शेतकर्यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्यांना मिळावी. शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अनेक कृषी सहायक गावात जातच नसल्याने शेतकर्यांना सल्ला मिळत नाही. यामुळे अशिक्षित शेतकर्यांची पंचाईत होत आहे. कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कृषी सहायकांकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील शेतकर्यांना शेती विषयक सल्ला मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी तसेच शासनाकडून राबविण्यात येणार्या योजना योग्य प्रकारे राबविल्या जात आहेत का याची पाहणीसह इतर उद्देशाने कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यात तब्बल ४४ कृषी सहायकांची नेमणूक कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या कृषी सहायकांनी ठरवून दिलेल्या गावांमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकर्यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना शेती विषयक मार्गदर्शन करणे , शासनाच्या योजनांची माहिती देणे असा या मागचा उद्देश असला तरी कृषी सहायक मात्र आठवड्यातून एकदाच ठरवून दिलेल्या गावात जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले. यामुळे शेतकर्यांना वेळेवर सल्ला व मार्गदर्शन मिळत नाही. तालुक्यातील ४४ पैकी अनेक कृषी सहायक मुख्यालयी न राहता इतरत्रच राहतात. ते आठवड्यातून एखादेवेळीे गावात जाता व ठराविक शेतकर्यांचीच भेट घेतात. यामुळे इतर शेतकर्यांना मार्गदर्शन हवे असेल तर त्यांना कृषी सहायक शोधावा लागतो. वेळेवर कृषी सहायक मिळत नसल्याने त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नसल्याचे संजय खंडागळे यांनी सांगितले. तालुक्यात अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन कृषी सहायकांना संबंधित गावातच रहावे व त्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी सचिन वाघुले यांनी केली आहे. तसेच जे कृषी सहायक मुख्यालयी न राहता इतर ठिकाणी राहून आपला कारभार हाकतात अशांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात आष्टी तालुका कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी पी.के. शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, जे कृषी सहायक शेतकर्यांना मार्गदर्शन करत नाहीत किंवा मुख्यालयी राहत नाही, अशांची लेखी तक्रार आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. (वार्ताहर)
‘कृषी सहायक घरी, सल्ला वार्यावरी’
By admin | Updated: June 3, 2014 00:43 IST