नाशिक : महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर तोट्यात चालत असून, ते चालविण्यासाठी ठेकेदाराचा शोध सुरू असताना, आता आणखी तीन नाट्यगृहे बांधण्याचा अट्टहास सुरू आहे. त्यापैकी दोन नाट्यगृहे नाशिकरोड विभागात बांधण्याचे घाटत असून, ती कशी चालतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे पंचवटीत एक नाट्यगृह बांधण्यात येत असून, आमदार निधीच्या या कामात चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, अशी अवस्था होणार आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर बांधण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत हे नाट्यगृह नाटकांपेक्षा तेथील दुरवस्थेनेच गाजत आहे. कलामंदिराचे दर वाढवूनही खर्च त्या प्रमाणात निघत नाही. सध्या या नाट्यगृहावर ८० लाख खर्च होतो आणि उत्पन्न मात्र ५० ते ६० लाख रुपये मिळते. नाट्यगृह हा महापालिकेच्या व्यवसायाचा भाग नाही, तर ती सामाजिक दायित्वातून बांधलेली वास्तू असल्याने त्या विषयी फार गांभीर्याने विचार केला जात नाही. तथापि, सत्ताधिकाऱ्यांपैकी काहींनी हेच निमित्त करून घाट्यात चाललेल्या कलामंदिराला ठेकेदाराच्या कह्यात देण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र आणखी तीन नाट्यगृहे बांधण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च आणि त्याला आलेली अवकळा बघून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच अशा प्रकाराची कामे करणे हे पालिकेचे काम नाही, असे सांगत असतानादेखील आता मनसेच्याच कारकीर्दीत हा अट्टहास होत आहे.गेल्या पंचवार्षिक कारकीर्दीत नाशिकरोड येथील कोठारी यांच्या आरक्षित जागेत नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभागातदेखील नाट्यगृह बांधण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याची तयारी सुरू आहे. तसेच पंचवटीत मखमलाबाद नाका म्हणजेच सध्याच्या पालिका विभागीय कार्यालयाजवळील भांडाराच्या जागेतही नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव आहे. आमदार निधीतून हे नाट्यगृह बांधण्यात येत असल्याचे सांगितले जात असताना आमदार निधी दोन कोटी, तर सात कोटी नाशिक महापालिका खर्च करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे ‘कालिदास’ अडचणीत असल्याचे निमित्त करून त्याचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे मात्र आणखी तीन नाट्यगृहे बांधण्याची तयारी सुरू झाल्याने ही भविष्यकालीन ठेक्याची तरतूद तर नव्हे ना, असा प्रश्न केला जात आहे. (प्रतिनिधी)
निम्या पावसाळ्यानंतरही तलाव कोरडेठाक
By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST