कोळगाव/ राक्षसभुवन: गेवराई तालुक्यात सोमवारी व मंगळवारी पाऊस पडताच बुधवारपासून शेतकऱ्यांनी पेरणीस सुरूवात केली. पाऊस उशिरा पडल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी बाजरीची पेरणी केली आहे. गेवराई तालुक्यात या वर्षी तब्बल एक महिन्याने उशिरा पाऊस पडला आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र बऱ्यापैकी असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करतात. या वर्षी मात्र उशिरा पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशीचे क्षेत्र कमी करून बाजरीची पेरणी करणे पसंत केले. कोळगावसह परिसरातील खडकी, तांदळा, काजळा, सावरगाव, पोखरी, काळेवाडी, टाकळगव्हाण येथील शेतकरी बुधवारी सकाळपासूनच पेरणीसह कपाशी लागवडीचे काम करीत असल्याचे दिसून आले. अनेक शेतकऱ्यांचे सर्वच कुटुंब शेतात कपाशी लावण्याचे काम करीत होते. गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र पाऊस पडताच शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. राक्षसभुवनसह परिसरातील शेतकऱ्यांचीही सकाळपासून पेरणीसाठी लगबग होते. काही शेतकऱ्यांनी दोरीने अंतर मोजून तर काही शेतकऱ्यांनी रेघोट्या मारून कपाशीची लागवड केली. यासाठी शेतकरी सकाळपासूनच सुतार, लोहार, कारागीरांकडून औत तयार करून घेत होते. दोन दिवसांत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसह खतही दिले. बुधवारी सकाळपासून जवळपास सर्वच शेतकरी पेरणी , लागवडीसाठी लगबग करीत होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मजुरही मिळाले नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कुटुंबातील लहान- थोरांसह सर्वच जणांना कपाशी लागवडीसाठी शेतात पेरणीच्या कामास जुंपले. या वर्षी पाऊस उशिरा पडल्याने कपाशी ऐवजी बाजरी, सोयाबीनचा पेरा केल्याचे शेतकरी अप्पासाहेब धस यांनी सांगितले. (वार्ताहर)
पावसानंतर शेतकऱ्यांची ‘चाड्यावर मूठ’
By admin | Updated: July 10, 2014 00:57 IST