औरंगाबाद : शहरात तब्बल २० दिवसांनंतर रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासाभराच्या पावसाने शहरातील अनेक भागातील रस्ते पाण्यात बुडाले. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांची तारांबळ उडाली. चिकलठाणा वेधशाळेत रात्री ८.३० वाजेपर्यंत २२.२ मि. मी. पावसाची नोंद झाली.
शहरात ६ जून रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या दिवशी तासाभराच्या पावासाने अनेक भागातील घरांत पाणी शिरण्याचा प्रकार झाला होता. परंतु या दिवसानंतर शहरात पावसाने पाठ फिरविली होती. गेली काही दिवस अधूनमधून केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली. परंतु रविवारी पावसाने पुनरागमन केले. सायंकाळी ५ वाजेनंतर आकाशात मोठ्या प्रमाणात ढगांची गर्दी झाली आणि ७ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी हलक्या स्वरुपात बरसणाऱ्या पावसाने काही वेळातच जोर धरला. शहर आणि परिसराला पावसाने चांगलेच धुवून काढले. जवळपास अर्धा तास पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे गुलमंडी, अंगुरीबाग परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी बंद असलेल्या दुकानांच्या शेटरपर्यंत पाणी पोहोचले होते. अशीच स्थिती शहरातील अन्य सखल भागातील रस्त्यांवर पहायला मिळाली. रात्री ८ वाजेनंतर रिमझिम स्वरुपात पाऊस बरसत होता.
आजही पावसाचा अंदाज
एमजीएम जेएनईसी वेधशाळेत २७.४ मि.मी. आणि एमजीएम गांधेली येथे २४.९ मि. मी. पावसाची नोंद झाली. शहरात सोमवारी हलक्या पावसाची अपेक्षा आहे, असे हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.