औरंगाबाद : उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी लवकरच चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर कार्गो सेवा सुरू होणार आहे. या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्ली, मुंबई येथून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो निर्यातीसाठी जो दर आकारला जातो, त्याच दरात एअर इंडिया काही महिन्यांसाठी औरंगाबादेतून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा देणार आहे. त्यामुळे कार्गो सेवा वाढीला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे. विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीच्या जागी एअर कार्गोची सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर केले जात आहे. आजघडीला शहरातून दिल्ली, मुंबई येथे विविध माल पाठविला जातो आणि तेथून विविध देशांत त्या मालाची निर्यात केली जाते, अशा परिस्थितीत औरंगाबाद ते मुंबई तसेच दिल्ली असा वाहतूक खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेसाठी दिल्ली, मुंबई येथील दर मोजावा लागतो. दिल्ली, मुंबई येथून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेसाठी जो दर मोजावा लागतो, तोच दर एअर इंडियाकडून सुरुवातीचे काही महिने औरंगाबादेत आकारला जाणार आहे. त्यामुळे औरंगाबाद ते मुंबई आणि दिल्लीपर्यंतचा वाहतुकीचा खर्च वाचेल.
स्वस्तात एअर कार्गो सेवा
By admin | Updated: December 20, 2015 00:09 IST