हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविताना शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसून येत आहे. त्यात आता मुख्य कार्यकारी अधिकारी शाळांच्या भेटी घेत असून उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागासह इतर अधिकाऱ्यांना शाळा दत्तक दिल्या जात आहेत.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात प्रत्येक शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेऊन गुणवत्ता तपासली जात आहे. सदर उपक्रमाची अंमलबजावणी चोखपणे होण्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपासणी होत आहे. विशेष म्हणजे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड शाळांच्या भेटी घेऊन उपक्रमाचा आढावा घेत आहेत. शिक्षकांना आवश्यक माहिती देत आहेत. शाळेतील एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, याची काळजी घेत शिक्षण विभागाकडून तालुका व केंद्र स्तरावर प्रेरणा कार्यशाळा घेण्यात येत आहेत. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी किती प्रगत झाले आहेत, याची तपासणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ज्ञानरचनावाद प्रणालीचा आधार घेतला जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित शैक्षणिक क्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यूडायएसप्रमाणे जिल्ह्यामध्ये जि. प. व खाजगी मिळून १२८६ शाळा आहेत.याबाबत शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे यांना विचारले असता, ते म्हणाले, प्र्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सर्व शाळा स्तरावर राबविल्या जात आहे. प्रथम भेटीत शाळेत उपक्रम पद्धती, दुसऱ्या भेटीत विद्यार्थ्यांची प्रगती, तर तिसऱ्या भेटीमध्ये आवश्यक सूचना व अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील ६० च्यावर शाळांना त्यांनी भेटी दिल्याचे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांना शाळा दिल्या दत्तक
By admin | Updated: January 15, 2016 23:33 IST