औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठा विभागासाठी मागील दोन वर्षांत रसायन खरेदी केल्यामुळे त्यामध्ये घोळ झाल्याचा आरोप करून सेना नगरसेवकांनी प्रशासनाची कोंडी केली. कार्याेत्तर मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर महापौरांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. ११ आॅगस्टच्या अंकात लोकमतने जलशुद्धीकरण रसायन खरेदीत घोळ झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन नगरसेवकांनी सभागृहात प्रशासनाला कोंडीत पकडले. सभापती विजय वाघचौरे यांनी प्रस्ताव क्र. ५७० चा खुलासा मागविला. तर नगरसेवक समीर राजूरकर म्हणाले, प्रशासनाने आजवर खरेदी केली. मग प्रस्ताव एवढ्या उशिरा का आणला. आजवर परस्पर बिल अदा केले आहे. मग यावेळीही प्रशासनाने परस्पर बिल देऊन टाकायचे. सभागृहात कशाला प्रस्ताव आणला, असा टोला उपमहापौर संजय जोशी यांनी लगावला. पाणीपुरवठा योजनेंतर्गत फारोळा येथे ५६ व १०० द.ल.लि. जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. दोन्ही शुद्धीकरण केंद्रात दररोज सरासरी १४५ ते १५० द.ल.लि. पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत तुरटी ग्रेड-१, पॉली अॅल्युमिनियम क्लोराईड (पीएसी) पावडर, ब्लिचिंग पावडर ग्रेड-१ व क्लोरिन या रसायनांचा वापर केला जातो. आजवर १६० टन पीएसी पावडर खरेदीला मान्यता देण्यात आली. सुमारे ५० लाख रुपयांची ती पावडर होती. त्याच काळात १८ लाख रुपयांची तुरटी खरेदी करण्यात आली. २०११-१३ या काळात ते रसायन खरेदी करण्यात आले.
रसायन खरेदीवरून प्रशासनाची कोंडी
By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST