बीड : माध्यमिक विभागात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या आॅनलाईन समायोजन प्रक्रिया सध्या सुरु आहे. जि.प. च्या वतीने बुधवारपासून विशेष शिबिराचा प्रारंभ झाला.जिल्ह्यात ४०५ अनुदानीत खासगी संस्था आहेत. २०१५- १६ च्या संचमान्यतेनुसार या सर्व संस्थांत १९९ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यांच्या आॅॅनलाईन समायोजनाची प्रक्रिया शासन स्तरावरुन पहिल्यांदाच राबविली जात आहे. मात्र, बहुतांश संस्थांना शिक्षण विभागाच्या संकेतस्थळांवर भरावयाच्या माहितीबाबत संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर जि.प. ने बलभीम महाविद्यालयात बुधवार ते शनिवारपर्यंत तालुकानिहाय शिबीर आयोजित केले आहे. आॅनलाईन माहिती भरावयाची असल्याने अनेक संस्थांची मोठी अडचण झाली असल्याचे चित्र आहे.पहिल्या दिवशी बीड व वडवणी तालुक्यातील मुख्याध्यापक व लिपिकांना आवश्यक त्या अभिलेख्यांसह बोलावले होते. दरम्यान, आॅनलाईन माहिती न भरल्यास संबंधित संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन अदा होणार नाही. यास संस्था जबाबदार राहतील, असा इशारा शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
‘माध्यमिक’च्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
By admin | Updated: July 14, 2016 01:14 IST